
माणदेश एक्सप्रेस न्यूज | पुणे :
परदेशात हॉटेल व्यवसायात भागीदारीचे आमिष दाखवून पुण्यातील व्यापाऱ्याची तब्बल ५४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये किरणकुमार त्रिवेदी (रा. कांताकुंज, गुजरात), चंद्रेश त्रिवेदी, जान्हवी चंद्रेश त्रिवेदी (दोघेही रा. साल्सबर्गर स्ट्रीट, जर्मनी), नीती पांडेय, तृप्ती नितीन पांडेय (रा. वल्लभनगर, इंदूर, मध्य प्रदेश) या व्यक्तींचा समावेश आहे. याबाबत हरदीपसिंग अमोलकसिंग होरा (५४, रा. सायकल मर्चंट हाऊसिंग सोसायटी, रास्ता पेठ, पुणे) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जर्मनीतील किल (Kiel) नावाच्या शहरात दोन रेस्टॉरंट व बार व्यवसाय सुरु असल्याचे आरोपींनी फिर्यादींना सांगितले. या व्यवसायातून कोट्यवधींचा नफा होत असून, आणखी एक नवीन हॉटेल सुरू करायचे नियोजन असल्याचे आरोपींनी खोटे आश्वासन दिले.
त्यात भागीदारी हवी असल्यास २५ टक्के शेअरपोटी ५४ लाख रुपये गुंतवावे लागतील, असे आमिष दाखवण्यात आले. एवढेच नाही, तर फिर्यादींच्या मुलाला दोन लाख रुपये प्रतिमहिना पगार, तसेच त्यांच्या भाच्यालाही व्यवसायात भागीदार करण्याचे आश्वासन देण्यात आले.
या आमिषाला भुलून फिर्यादींनी वेगवेगळ्या वेळेस बँक ट्रान्सफर आणि रोख स्वरूपात एकूण ५४ लाख रुपये आरोपींना दिले. मात्र, प्रत्यक्षात कोणताही हॉटेल व्यवसाय सुरु करण्यात आला नाही. काही काळानंतर संपर्कही तोडण्यात आला आणि फिर्यादींना मोठा आर्थिक फटका बसला.
या प्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस आरोपींचा पत्ता लावून त्यांना अटक करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. प्राथमिक चौकशीत आरोपींनी परदेशातील व्यवसायाचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली, असे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास समर्थ पोलिस करत आहेत.