ZP शाळेच्या मैदानावर गौतमी पाटीलचा डान्स ; गर्दी उसळली आणि पोलिसांचा लाठी चार्ज

0
244

माणदेश एस्क्प्रेस न्यूज | हिंगोली :
हिंगोली शहरात शनिवारी रात्री आयोजित करण्यात आलेल्या लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटीलच्या नृत्याच्या कार्यक्रमापूर्वीच पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागल्याची घटना घडली. जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर आयोजित या कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दी उसळल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.


कार्यक्रम स्थळाबाहेर आणि मैदानाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर तरुणांचा जमाव वाढू लागला. पोलिसांनी परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता ओळखत जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. यामध्ये काहींना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. तथापि, पुढील गोंधळ टाळण्यासाठी पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली.


हा मनोरंजक कार्यक्रम शिंदे गटाच्या युवासेनेचे जिल्हाप्रमुख राम कदम यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम स्थळी आमदार संतोष बांगर यांचे भलेमोठे पोस्टर लावण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीची अपेक्षा होती. मात्र, त्यांनी कार्यक्रमाला गैरहजर राहून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.


गौतमी पाटील सध्या महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय असून तिच्या कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर युवक वर्गाचा ओढा दिसतो. मात्र, अशा कार्यक्रमांत होणारी गर्दी, सुरक्षेची अपुरी व्यवस्था आणि होणारे गोंधळ यामुळे वारंवार पोलिसांना हस्तक्षेप करावा लागत आहे. हिंगोलीतील प्रकाराने पुन्हा एकदा या प्रश्नावर बोट ठेवले आहे.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला झालेल्या गोंधळामुळे काही काळ परिसर तणावग्रस्त झाला होता. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि नृत्य कार्यक्रम पार पडला. दरम्यान, या प्रकरणावरून स्थानिक राजकीय नेत्यांच्या हालचालींवर आणि कार्यक्रम आयोजकांच्या व्यवस्थापन क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here