गाैतमी पाटील अडचणीत; नवले पूल अपघात प्रकरण गाजले

0
499

माणदेश एक्स्प्रेस न्यूज | पुणे :
नवले पूल परिसरात झालेल्या एका भीषण अपघाताने शहर हादरून गेले आहे. पहाटे पाचच्या सुमारास रिक्षाचालक सामाजी मरगळे आपल्या रिक्षामध्ये पॅसेंजरच्या प्रतीक्षेत उभे होते. तेवढ्यात मागून आलेल्या भरधाव कारने रिक्षाला जबर धडक दिली. या भीषण धडकेत रिक्षा अक्षरशः तीन पलटी मारत रस्त्यावर कोसळली. रिक्षाचालक सामाजी मरगळे गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर बेशुद्ध पडले.

धडक दिल्यानंतर गाडीतून काही लोक खाली उतरले. आजूबाजूला फार कोणी नसल्याचा अंदाज घेत त्यांनी घटनास्थळ सोडून दिले. इतकेच नव्हे, काही वेळाने एक व्यक्ती टोईंग व्हॅन घेऊन घटनास्थळी आला आणि अपघातग्रस्त कार उचलून नेली. मात्र, त्या दरम्यान जखमी रिक्षाचालक रस्त्यावरच तडफडत पडून राहिला.


या अपघातात सहभागी असलेली कार दुसऱ्या-तिसऱ्या कुणाची नसून प्रसिद्ध नृत्यांगना गाैतमी पाटील हिचीच असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे या घटनेने मोठा राजकीय आणि सामाजिक वादंग निर्माण केला आहे.


अपघातानंतर रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी थेट पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

  • पोलिस गाैतमी पाटीलला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

  • अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज दाखवले जात नाही.

  • कार कोण घेऊन गेला, त्याचा तपास होत नाही.

या सर्व मुद्द्यांवरून कुटुंबियांनी ठाकरेंच्या शिवसेनेसोबत पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन छेडले.


रिक्षाचालकाचे नातेवाईक थेट उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पोहोचले. यावेळी त्यांनी थेट डीसीपींना फोन करून तत्काळ कारवाईचे आदेश दिल्याचे समजते.


या अपघात प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी आता विशेष तपास पथक नेमले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. तसेच अपघातग्रस्त गाडी उचलण्यासाठी क्रेन कोणी बोलावली याचाही शोध पोलिस घेत आहेत.


अपघाताच्या वेळी कार गाैतमी पाटील हिच्या चालकाने चालवली होती, असा पोलिसांचा दावा आहे. मात्र, रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी या दाव्यावर गंभीर संशय व्यक्त केला आहे. खरंच कार कोण चालवत होतं? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.


या प्रकरणामुळे गाैतमी पाटील चांगलीच अडचणीत सापडली आहे. समाजमाध्यमांवरही तीव्र चर्चा सुरू असून, लोकांचा रोष वाढताना दिसतोय. आता गाैतमी पाटील या प्रकरणावर काय प्रतिक्रिया देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here