
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | पुणे :
लोकप्रिय नृत्यांगना गाैतमी पाटील पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पुण्यात 30 सप्टेंबर रोजी झालेल्या भीषण अपघातानंतर हा वाद अधिकच चिघळला असून आता थेट भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याही या प्रकरणात एंट्री झाली आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी कठोर कारवाईची मागणी केली असून, ठाकरेंची शिवसेनाही आक्रमक झाली आहे.
30 सप्टेंबर रोजी पुण्यात गाैतमी पाटीलच्या नावावर असलेल्या गाडीने जोरदार धडक दिल्याने रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू असले तरी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर जखमीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, सीसीटीव्ही फुटेज देण्यात येत नाही आणि गाडीतून उतरलेल्या व्यक्तीचा चेहरा लपवला जातोय, असा गंभीर आरोप रिक्षाचालकाच्या मुलीने केला.
या प्रकरणात ठाकरेंच्या शिवसेनेने पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. “अपघात घडला आहे, मग सत्य का दडवले जातेय? जबाबदार व्यक्तीला अटक का होत नाही?” असा सवाल आंदोलनादरम्यान करण्यात आला.
सर्वच प्रयत्न फसत असल्याने रिक्षाचालकाची मुलगी थेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे गेली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी स्वतः डीसीपींना फोन केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या फोन कॉलमध्ये चंद्रकांत पाटील पोलिस अधिकाऱ्यांना थेट विचारताना दिसतात –
👉 “काय ते गाैतमी पाटीलला उचलायचं की नाही? गाडी कुणाची आहे? जर ती गाडीत नव्हती तर मग कोण चालवत होतं? भूत गाडी चालवत होतं का? जो कोणी गाडी चालवत होता त्याला पकडायलाच हवे. केस दाखल केली का? गाडी जप्त केली का?”
पुढे त्यांनी स्पष्ट निर्देश देत म्हटले –
👉 “गाडीची मालकीन गाैतमी पाटील आहे, तिला नोटीस द्या. त्या गरीब रिक्षाचालकाचा खर्च काढायला लावा.”
चंद्रकांत पाटलांच्या हस्तक्षेपानंतर पुणे पोलिसांनी गाैतमी पाटीलला नोटीस पाठवली आहे. अपघातात जबाबदारी निश्चित करण्यासाठी तपास सुरू आहे. गाडी कोण चालवत होतं, गाैतमी प्रत्यक्ष उपस्थित होती का, या सर्व बाबींची चौकशी सुरू झाली आहे.
या घटनेनंतर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे –
👉 “गाैतमी पाटीलला अटक होणार का?”
कारण, गाडी तिच्या नावावर असल्याने कायदेशीर जबाबदारी टाळता येणार नाही, असा कायदेतज्ज्ञांचा दावा आहे.
रिक्षाचालकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याचबरोबर कुटुंबीयांचा आरोप, राजकीय हस्तक्षेप आणि पोलिसांची हालचाल यामुळे हे प्रकरण केवळ अपघातापुरते मर्यादित न राहता मोठ्या राजकीय वादळात रूपांतरित होण्याची चिन्हे आहेत.