
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | जळगाव :
जळगाव जिल्ह्यातील गौताळा अभयारण्यातून एक थरारक आणि भयचकित करणारी घटना उघडकीस आली आहे. अभयारण्यात फिरायला गेलेल्या नागरिकांना घनदाट जंगलात शिर नसलेला मृतदेह सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. त्याच्या शेजारी जबडा फ्रॅक्चरची चिन्हं होती, तसेच दातामध्ये बसवलेली मेटल क्लिप पोलिसांच्या हातात महत्त्वाचा धागा लागून गेली.
या प्रकरणाने पोलिसांसमोर एक मोठं कोडं उभं राहिलं होतं – हा मृतदेह नेमका कोणाचा? आणि अशा निर्घृण पद्धतीने खून का करण्यात आला?
कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत सायगव्हान शिवारातील गट क्रमांक 75 मधील गौताळा अभयारण्यात 26 ऑगस्ट रोजी हा मृतदेह आढळून आला. सनसेट पॉइंटजवळ घनदाट जंगलात मान नसलेलं धड पडलेलं आढळलं. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
केवळ 24 तासांत पोलिसांनी मृतदेहाचं शीरही शोधून काढलं. वैद्यकीय तपासणीत जबडा फ्रॅक्चर झाल्याचं स्पष्ट झालं. विशेष म्हणजे मृतदेहातील दातांवर बसवलेली क्लिप्स पाहून पोलिसांना त्याची ओळख पटवता आली.
दातावरील उपचारामुळे पोलिसांना मृत तरुणाचं नाव मिळालं. मृतकाचं नाव निखिल हिरामण सूर्यवंशी (वय 28, रा. शिंदी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) असं निष्पन्न झालं.
पोलिसांनी लगेच निखिलच्या कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी आणि शेजाऱ्यांची कसून चौकशी सुरू केली. बहुतेक सर्वजण पोलिसांसमोर उपस्थित झाले. मात्र, निखिलचा जिवलग मित्र श्रावण ज्ञानेश्वर धनगर मात्र वारंवार चौकशीसाठी टाळाटाळ करत होता. त्याच्यावरील संशय अधिक गडद झाला.
शेवटी पोलिसांनी श्रावणची रीतसर चौकशी केली. कसून चौकशीत त्यानेच खुनाची कबुली दिली. त्याने सांगितले की,
त्याने निखिलला “छत्रपती संभाजीनगरला मैत्रिणीला भेटायला जाऊया” असं सांगून मोटरसायकलवर बोलावलं.
दोघे अभयारण्याच्या सनसेट पॉईंटपर्यंत गेले.
तेथे श्रावणने निखिलला सुनावलं की “तू चोरी करतोस, दारू पितोस, चुकीच्या गोष्टी करतोस… तुझ्यामुळे माझी बदनामी होते. तू मेलास तरच माझ्या अडचणी दूर होतील. आज तुझा शेवटचा दिवस आहे.”
हे बोलताच त्याने सोबत आणलेल्या कुऱ्हाडीने निखिलवर वार केले.
एवढेच नाही तर, वार इतके भीषण होते की निखिलचं धड आणि शीर वेगळं झालं. त्यामागचा हेतू होता मृतदेहाची ओळख पटू न देणं.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सलग सात दिवस शिंदी गावात मुक्काम करून सखोल चौकशी केली. कुटुंबीय व साक्षीदारांचे जबाब घेतले. शेवटी मिळालेल्या तांत्रिक पुरावे आणि संशयिताच्या हालचालींवरून संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.
सध्या आरोपी मित्र श्रावण ज्ञानेश्वर धनगरला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निखिल आणि श्रावण यांच्यात नेमकं कोणतं वैर वाढलं होतं?
आरोपीने जाणीवपूर्वक एवढं थरारक षड्यंत्र रचून मित्राचा खून का केला?
मृत्यूच्या आधी खरंच त्यांच्यातील वाद इतका वाढला होता का?
या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पोलिस अधिक तपास करत आहेत.