
माणदेश एक्सप्रेस न्यूज :–
गणेशोत्सव म्हटलं की महाराष्ट्रभर उत्साहाचं वातावरण तयार होतं. विशेषत: मुंबईत तर या दिवसांत लाखो गणेशभक्त दर्शनासाठी गर्दी करतात. लालबागचा राजा, गणेशगल्लीचा गणपती, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि गिरगावचा गणेश यांसारख्या मंडळांपुढे प्रचंड रांगा लागतात. याच पार्श्वभूमीवर भाविकांची सोय आणि सुरक्षितता लक्षात घेऊन मध्य रेल्वेने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
प्रत्येक रविवारी प्रमाणे मध्य रेल्वे मार्गावर देखभाल आणि दुरुस्तीच्या कारणास्तव मेगाब्लॉक घेतला जातो. या दरम्यान अनेक गाड्या रद्द केल्या जातात किंवा त्यांचे वेळापत्रक बदलले जाते. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. परंतु यंदा गणेशोत्सवाच्या गर्दीमुळे भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून मध्य रेल्वेने उद्याचा (रविवार, ३१ ऑगस्ट) नियोजित मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, मेगाब्लॉक रद्द केल्यामुळे रविवारी मध्य रेल्वेवरील सर्व लोकल गाड्या नेहमीप्रमाणेच वेळेवर चालतील. यामुळे गणेशभक्तांना मुंबईतील विविध गणपतींचे दर्शन घेण्यासाठी कोणताही अडथळा येणार नाही.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गर्दीमुळे प्रवाशांना गैरसोयी टाळण्यासाठी घेतलेला हा निर्णय भाविकांसाठी दिलासादायक ठरणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे भाविकांना वेळेत आणि आरामात प्रवास करून सहजपणे दर्शन घेता येणार आहे.
रेल्वे प्रशासनाचा निर्णय जाहीर होताच गणेशभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईतील गर्दीच्या प्रवासात अडथळा न येता गणपती बाप्पाचे दर्शन घेता येणार असल्याने सर्वत्र रेल्वे प्रशासनाचे कौतुक होत आहे.