
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | कोल्हापूर :
गणेशोत्सव मंडळातील जुन्या वादातून भररस्त्यावर बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची थरारक घटना मंगळवारी मध्यरात्री बळवंतनगर कॉर्नर येथे घडली. या प्रकरणी पाचगाव (ता. करवीर) येथील पोलिस रेकॉर्डवरील रणजित राजेंद्र गवळी (वय 35), त्याचा भाऊ चेतन राजेंद्र गवळी (32, रा. सहजीवन हौसिंग सोसायटी) व अरुण संभाजी मोरे (29, रा. कळंबा) या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. संशयितांकडून गावठी बंदूक व मोटार हस्तगत करण्यात आली असून, गणेशोत्सवाच्या तोंडावर घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ माजली आहे.
बळवंतनगर येथील ऋषिकेश बाळासाहेब भोसले (रा. इंदिरानगर घरकूल) यांनी याबाबत करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. बळवंतनगर मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. यापूर्वी ऋषिकेश भोसले व रणजित गवळी यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर रणजित काही काळ निष्क्रिय होता.
मंगळवारी मध्यरात्री दीड वाजेपर्यंत मंडळाची गणेश आगमनाची मिरवणूक सुरू होती. या मिरवणुकीच्या नियोजनात ऋषिकेश पुढाकार घेत होता. याच कारणावरून जुन्या वादाला पुन्हा ऊत आला.
मिरवणूक संपल्यानंतर रणजित गवळी, भाऊ चेतन व साथीदार अरुण मोरे मोटारीतून बळवंतनगर कॉर्नर येथे आले. तिघांनी ऋषिकेशला शिवीगाळ करून धमकी दिली. “मंडळात आम्हाला विचारल्याशिवाय पाय ठेवायचा नाही, अन्यथा तुला बघून घेईन,” अशी धमकी देण्यात आली. त्यावर वाद वाढला आणि रणजितने मोटारीत ठेवलेली सिंगल बोअरची गावठी बंदूक काढून ऋषिकेशवर रोखली. या अचानक प्रकारामुळे चौकात प्रचंड गोंधळ उडाला.
काही तरुणांनी धाडसाने रणजितकडून बंदूक हिसकावून घेतली आणि तणाव निवळला. त्यानंतर ऋषिकेश भोसले यांनी तातडीने करवीर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर पोलिस निरीक्षक श्रीकांत शिंदे व निरीक्षक रवींद्र कळमकर घटनास्थळी दाखल झाले. संशयित रणजित, चेतन व अरुण या तिघांना ताब्यात घेऊन गावठी बंदूक व मोटार जप्त करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजित गवळीवर यापूर्वी जुना राजवाडा व करवीर पोलिस ठाण्यात विविध गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे त्याचा गुन्हेगारी रेकॉर्ड लक्षात घेता, या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
गणेशोत्सवाच्या तोंडावर घडलेल्या या प्रकारामुळे बळवंतनगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून, सणादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पावले उचलण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.