
माणदेश एक्सप्रेस न्यूज | आरोग्य
आपल्या दैनंदिन जीवनात दूध हा आहाराचा महत्त्वाचा भाग मानला जातो. प्रत्येक घरात दूधाचा नियमित वापर केला जातोच. डॉक्टरसुद्धा आरोग्यासाठी रोज दूध प्यायचा सल्ला देतात. मात्र प्रश्न कायम चर्चेत असतो – गायीचे दूध चांगले की म्हशीचे? कोणते दूध सहज पचते आणि किडनीसाठी योग्य आहे? चला तज्ज्ञांच्या मते जाणून घेऊया.
गायीचे दूध : हलके व सहज पचणारे
तज्ज्ञांच्या मते गायीच्या दुधात फॅट आणि प्रोटीनचे प्रमाण म्हशीच्या दूधाच्या तुलनेत कमी असते. यामुळे ते हलके आणि पटकन पचणारे मानले जाते.
पचनाचे फायदे : ज्यांना ऍसिडिटी, गॅस, अपचन किंवा पोट बिघडण्याची समस्या आहे, त्यांच्यासाठी गायीचे दूध अधिक योग्य.
पौष्टिकता : गायीच्या दूधात विटामिन A आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते, जे डोळ्यांच्या आणि हाडांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.
किडनीसाठी योग्य : किडनीचे आजार असलेल्या रुग्णांसाठी गायीचे दूध फायदेशीर मानले जाते.
म्हशीचे दूध : ताकदवान पण जड
म्हशीच्या दुधात फॅट व प्रोटीन जास्त असल्याने ते घट्ट, मलईदार व चविष्ट असते. मात्र हे दूध पचायला गायीच्या दुधापेक्षा जड असते.
एनर्जी आणि ताकद : व्यायाम करणारे, जिमला जाणारे किंवा अंगमेहनतीचे काम करणाऱ्या लोकांना म्हशीचे दूध जास्त फायदेशीर ठरते. कारण यात जादा प्रोटीन असून मसल्स वाढवण्यासाठी ते उपयुक्त ठरते.
जडपणा : ज्यांचे पचन कमजोर आहे, त्यांना म्हशीचे दूध पिल्याने गॅस, जडपणा किंवा अपचन होऊ शकते.
किडनीसाठी कोणते दूध योग्य?
दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलच्या नेफ्रोलॉजी विभागाचे डॉ. अनुज मित्तल यांचे मत असे की –
म्हशीच्या दुधात प्रोटीन जास्त असल्यामुळे किडनीवर जास्त लोड येतो. विशेषतः किडनी कमजोर असलेल्या लोकांनी ते टाळावे.
गायीच्या दुधात प्रोटीन कमी असल्याने किडनीवर ताण पडत नाही. त्यामुळे डॉक्टर किडनीच्या रुग्णांना गायीचे दूध पिण्याचा सल्ला देतात.
कोणते दूध निवडावे?
जर तुम्हाला हलके, सहज पचणारे दूध हवे असेल आणि किडनी कमजोर असेल तर गायीचे दूध सर्वात उत्तम.
जर तुमचे आरोग्य चांगले असेल, व्यायाम करत असाल व अधिक एनर्जी हवी असेल तर म्हशीचे दूध योग्य.
दूध निवडताना फक्त चव नव्हे तर तुमची तब्येत, गरज आणि डॉक्टरांचा सल्ला लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
👉 थोडक्यात :
पचन आणि किडनीसाठी = गायीचे दूध फायदेशीर
ताकद, मसल्स आणि एनर्जी साठी = म्हशीचे दूध उत्तम