
सांगली (प्रतिनिधी) : कामातून हातझटका मिळाल्याचा राग मनात ठेवून एका मित्राने दुसऱ्या मित्राचा भरचौकात चाकूने भोसकून खून केल्याची खळबळजनक घटना बुधगाव (ता. मिरज) येथे घडली. गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास झेंडा चौकात ही घटना घडली. सिकंदर मौला शिकलगार (वय ५२, रा. बुधगाव) याचा त्याच्याच मित्र रफिक मेहबूब पट्टेकरी (वय ५९, रा. वनवासवाडी, बुधगाव) याने खून केला. सांगली ग्रामीण पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
दारूच्या व्यसनामुळे कामावरून हकालपट्टी, खुनाचा उगम तिथेच
शिकलगार आणि पट्टेकरी हे दोघे एकाच गल्लीत राहणारे आणि पूर्वी एकत्र सेंट्रिंगच्या कामावर काम करणारे होते. बुधगावमधील एका ‘आरसीसी चेंबर’चे काम शिकलगारकडे होते. मात्र दोघांनाही दारूचे व्यसन असल्यामुळे संबंधित कंत्राटदाराने त्यांना कामावरून बाजूला केले. काही दिवसांनी हेच काम पुन्हा पट्टेकरीकडे देण्यात आले, यामुळे शिकलगार संतप्त झाला.
रात्री वाद, सकाळी चाकू हल्ला
बुधवारी रात्री शिकलगार व पट्टेकरी यांच्यात याच वादातून मोठा वाद झाला. शिकलगारने रागाच्या भरात पट्टेकरीला मारहाण केली. या अपमानाचा बदला घेण्यासाठी पट्टेकरीने गुरुवारी सकाळी घरातील भंगारात पडलेला चाकू घेऊन झेंडा चौकात उभ्या असलेल्या शिकलगारवर एकच जबरदस्त वार केला. छातीवर खोलवर वार झाल्याने शिकलगार गंभीर जखमी झाला आणि काही क्षणातच कोसळला.
हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळीच उभा, पोलिसांनी केली अटक
हल्ल्यानंतर पट्टेकरी घटनास्थळीच थांबला होता. नागरिकांनी पोलिसांना डायल ११२ वरून माहिती दिली. सांगली ग्रामीण पोलिस निरीक्षक किरण चौगले यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीला तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान दुपारी बाराच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
फिर्याद, गुन्हा दाखल व वरिष्ठांची भेट
या प्रकरणी शिकलगार याचा भाचा शब्बीर रसूल शिकलगार याने फिर्याद दिली आहे. पट्टेकरीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिस अधीक्षक संदीप घुगे आणि उपविभागीय अधिकारी विमला एम. यांनी घटनास्थळी भेट दिली.
आरोपीच्या कुटुंबाची पार्श्वभूमी
रफिक पट्टेकरी हा विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. मात्र त्याच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून पत्नी मुलांसह पुण्यात राहते. तो सध्या वृद्ध आईसोबत बुधगावमध्ये राहत होता. पोलिसांकडे दिलेल्या कबुलीजबाबात त्याने खून केल्याची कबुली दिली आहे.