
माणदेश एक्सप्रेस न्यूज | पॅरिस :
नेपाळमध्ये उसळलेल्या आंदोलकांच्या हिंसाचारानंतर आता फ्रान्समध्येही प्रचंड असंतोष उफाळून आला आहे. राजधानी पॅरिससह देशभरात हजारो आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले असून राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या सरकारविरुद्ध भीषण आंदोलन सुरू झाले आहे. ठिकठिकाणी जाळपोळ, तोडफोड, दगडफेक सुरू असून पोलिस व आंदोलकांमध्ये तीव्र संघर्ष होत आहेत.
सोशल मीडियावर “Block Everything” या नावाने एकत्रित दिलेल्या आवाहनानंतर या निदर्शनांना वेग आला आहे. या मोहिमेअंतर्गत लोकांना रस्त्यावर उतरून सर्व काही थांबवण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर हजारो नागरिकांनी पॅरिससह देशभरातील प्रमुख शहरांमध्ये एकत्र येत वाहतूक रोखली.
आंदोलनकर्त्यांनी रस्त्यांवर अडथळे निर्माण करत वाहतूक पूर्णपणे ठप्प केली. कचराकुंड्यांना आग लावण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी तोडफोड करण्यात आली. अनेकांनी पोलिसांवर दगडफेक केली. पॅरिसच्या मध्यवर्ती भागात आंदोलकांनी दुकाने आणि सरकारी इमारतींवरही हल्ला केला.
लोकांचे म्हणणे आहे की, मॅक्रॉन सरकारने नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. आर्थिक व्यवस्थापन पूर्णपणे ढासळले आहे. महागाई, बेरोजगारी आणि खर्च वाढत असतानाही सरकार गप्प आहे. त्यामुळे लोकांच्या रोषाला उधाण आले आहे.
या आंदोलनावर नियंत्रण मिळवण्यासाठी हजारो पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मात्र आंदोलकांचा उत्साह आणि आक्रमकता पाहता पोलिसांचे प्रयत्न अपुरे ठरत आहेत. अनेक ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधूर गोळ्यांचा वापर केला. काही आंदोलकांना अटकही करण्यात आली आहे.
संपूर्ण फ्रान्समध्ये आंदोलन पसरले असून विविध शहरांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. रेल्वे, बससेवा आणि रस्त्यांवरील वाहतूक अडथळ्यांमुळे ठप्प झाली आहे. अनेक व्यापारी वर्गाने दुकाने बंद ठेवली आहेत. प्रशासनाने नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन केले आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. देशात कायदा व सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. तथापि, आंदोलकांची तीव्रता आणि संघटित पद्धत लक्षात घेता ही लढाई कठीण असल्याचे प्रशासनालाही मान्य करावे लागत आहे.