
माणदेश एक्सप्रेस न्युज
तासगाव : तालुक्यातील तुरची येथील ग्रामपंचायतीच्या चार सदस्यांना अपात्र करण्यात आले आहे. मासिक बैठकांना सलग सहा महिने गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी ही कारवाई केली आहे.
याबाबत माहिती अशी, ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना सलग सहा महिने गैरहजर राहिल्यास महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 40 (1) नुसार संबंधित सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्यात येते. तुरची येथील ग्रामपंचायतचे सदस्य रोहिणी विकास खबाले, लताताई मधुकर गोरे, सुवर्णा सतीश पाटील व द्रौपदाबाई धुळा सातपुते हे सदस्य ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकांना सलग सहा महिने गैरहजर राहिले होते.त्यामुळे त्यांना अपात्र करावे, असा प्रस्ताव ग्रामपंचायत अधिकारी मच्छिंद्र झांबरे यांनी गटविकास अधिकारी के.पी.माने यांच्याकडे पाठवला होता.
या प्रस्तावासोबत आपला स्वयंस्पष्ट अहवाल जोडून गटविकास अधिकारी माने यांनी तो पुढील कारवाईसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे पाठवला. याप्रकरणी धोडमिसे यांच्या कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. सुनावणीस गटविकास अधिकारी के. पी. माने, विस्तार अधिकारी पोपट सुतार, ग्रामपंचायत अधिकारी मच्छिंद्र झांबरे, सरपंच विकास डावरे यांच्यासह चारही ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
यावेळी धोडमिसे यांनी सर्व कागदपत्रे पाहून ग्रामपंचायत सदस्याचे म्हणणे ऐकून घेतले.त्यांनतर सलग सहा महिने ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकांना दांडी मारणाऱ्या चारही सदस्यांना अपात्र करण्यासंदर्भातचा निर्णय धोडमिसे यांनी घेतला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे तुरची येथे खळबळ उडाली आहे.एकाच वेळी चार सदस्य अपात्र ठरल्याने चर्चेचा विषय बनला आहे.