
माणदेश एक्सप्रेस/कोल्हापूर : मागील काही दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगर अंतर्गत इतर पक्षातील नेते, पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश दिला जात आहे. याचा मोहिमेचा सर्वाधिक फटका उद्धव ठाकरेंच्या गटाला बसत आहे. त्यातच कोल्हापूरातही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन अनेक पक्षातील नेते, कार्यकर्ते शिवसेनेत येण्यास इच्छुक आहेत. लवकरच राज्यासह कोल्हापूरमध्येही ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून प्रवेश होतील असा दावा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने आणि माजी खासदार संजय मंडलिक यांनी केला आहे.
माजी आमदार सुजित मिणचेकर लवकरच शिंदेसेनेमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा शासकीय विश्रामगृहावर सुरू होती. मिणचेकर हेदेखील संध्याकाळी याठिकाणी उपस्थित होते. सदिच्छा भेटीसाठी आपण आल्याचं त्यांनी सांगितले मात्र मिणचेकर यांचा शिंदेसेनेतील प्रवेश फक्त औपचारिकता राहिली आहे. सुजित मिणचेकर हे उद्धव ठाकरेंच्या सेनेचे आमदार होते. अलीकडच्या काळात त्यांनी राजू शेट्टींच्या स्वाभिमानी पक्षातही प्रवेश केला होता. ते गोकुळ संघाचे संचालकही आहेत.
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय कुरघोडी सुरूच आहे. मागील काही दिवसांपासून ठाकरेंकडील अनेक पदाधिकारी, नेते शिंदेसेनेत प्रवेश करत आहेत. गेल्यावेळी याबाबत मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं होते की, पुढील काही दिवसांत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आणि पक्षसंघटनेतील अनेक पदाधिकारी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य करून आमच्याकडे प्रवेश करतील. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे तीन खासदार आमच्या संपर्कात आहेत. मात्र तांत्रिक कारणामुळे त्यांचा प्रवेश थांबला आहे. ऑपरेशन धनुष्यबाणसह ऑपरेशन टायगर देखील आम्ही राबवत आहोत.
या अंतर्गत पहिल्या टप्प्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि माजी आमदार आमच्याकडे येतील. याची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यापासून होणार आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि नंतर उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या भागातील अनेक माजी आमदार आणि पदाधिकारी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करतील असा दावा त्यांनी केला होता. याची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधील उद्धवसेनेचे माजी आमदार राजन साळवी यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशाने सुरू झाली.