
माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : राजापूरचे (जि. रत्नागिरी) माजी आमदार राजन साळवी यांचे मागील काही दिवसांपासून सुरू असलेले प्रवेशनाट्य काल (दि.१३) अखेर संपले. त्यांनी आपल्या समर्थकांसह टेंभीनाका येथील आनंदाश्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आनंदाश्रमात मंत्री उदय सामंत, किरण सामंत उपस्थित होते.
तत्पूर्वी साळवी यांनी आपल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. शिवसेना पक्षप्रवेशाआधी राजन साळवी यांनी आपल्या समर्थकांसह जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पक्षप्रवेशासाठी रत्नागिरी आणि राजापूर मतदारसंघांमधून ११ बसेसमधून कार्यकर्ते ठाण्यात दाखल झाले आहेत.
माजी आमदार साळवी म्हणाले की, पक्ष सोडताना डोळ्यात अश्रू आहेत. पण नवीन पहाट घेऊन सुरूवात करत आहे. रत्नागिरी जिल्ह्याबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी योग्य निर्णय घेतला नाही, अशी खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
विधानसभा निवडणुकीनंतर माजी आ. राजन साळवी हे पक्षात नाराज होते. उपनेते पद असतानाही निवडणुकीच्यावेळी आपल्याला पाठबळ मिळण्याऐवजी धोकाच मिळाल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, त्यांच्या मतांची दखल वरिष्ठ पातळीवर घेतली गेली नाही. त्यामुळे त्यांची नाराजी वाढली होती.
त्यानंतर ते भाजपात जाणार अशी चर्चा होती. त्यानंतर शिवसेनेत जाणार असल्याचीही चर्चा सुरु झाली होती. मुळात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यांशी त्यांचे अगदी घट्ट ऋणानुबंध होते. परंतु शिंदे यांच्या बंडानंतर राजन साळवी त्यांच्यासोबत जाणार असे चित्र होते. परंतु साळवींनी ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ठाकरेंच्या शिवसेनेकडून सहकार्य मिळत नसल्याने, अखेर राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याासोबत जाण्याचा निर्णय घेतला. अखेर ठाकरेंना साळवींनी जय महाराष्ट्र करीत धनुष्य हाती घेतले.