“या” बँकेच्या घोटाळ्यावर माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर काढणार ‘चाबूक मोर्चा’

0
6

माणदेश एक्सप्रेस न्युज/सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील विविध खरेदीत गैरव्यवहार, नोकरभरती, शासकीय निधी वाटपात सात शाखांत झालेला अपहार, नियमबाह्य कर्जवाटप यावर बॅंकेची कलम ८८ नुसार चौकशी सुरु आहे. ती तत्काळ पुर्ण करावी. विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा. तसेच विद्यमान आणि मागील संचालक मंडळावर गैरव्यवहाराची जबाबदारी निश्‍चित करून त्यांची वसुली करावी. यासह विविध मागण्याबाबत मंगळवारी (ता. २५) रोजी जिल्हा बॅंकेवर चाबूक मोर्चा काढण्याचा इशारा आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, ‘ जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची आहे. बँकेने सूतगिरण्या कंपन्या कारखाना तसेच जिल्ह्याबाहेरच्या कारखान्यांना आणि संस्थांना बेकायदेशीर शेकडो कोटींची रुपयांची कर्ज दिली. त्यांनी कर्ज बुडवले. कर्ज वसुलीसाठी बँकेचे अधिकारीच नेमले आहेत. हे अधिकारी कर्ज बुडवणाऱ्या संस्थांकडे न जाता थेट शेतकऱ्यांच्या दारात जातात. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जवसुली विरोधात आवाज उठवला पाहिजे. सरकारकडून अनुदान दुष्काळासाठी मिळणारा निधी हा जिल्हा बँकेत येतो. शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान निधी वर्ग केला जातो. मात्र हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग न करताच बँकेचे अधिकारी अपहार करतात. आणि त्या संदर्भातली चौकशी बँकेचे अधिकारी करतात. मुळात बँकेच्या कारभाराची संपूर्ण चौकशी सहकार खात्याने करावी अशी आमची मागणी आहे.

 

या साऱ्या अपहार, गैरव्यवहाराला बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारी संचालक आणि संचालक जबाबदार आहेत. त्यामुळे सध्याचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक करावी. तसेच, ‘ जिल्हा बॅंक मुख्यालय बांधकाम, नुतनीकरण, फर्निचर, एटीएम मशिन, नोटा मोजण्याचे मशिन खरेदीत घोटाळा झाला आहे. इस्लामपूर शाखा फर्निचर खरेदीत अपहार झाला आहे. बॅकेने सिक्युरिटायझेशन ॲक्टखाली सहा संस्थांची मालमत्ता खरेदी केली आहे. त्या मालमत्ता भाड्याने देणे, विक्री करणे यात दुजाभाव केला जात आहे. राजकीय लोकांना संरक्षण देण्यासाठी तसेच त्यांचे हित सांभाळण्यासाठी त्यांच्याविरोधात संचालक मंडळ निर्णय घेत नाही. शासनाकडून येणाऱ्या दुष्काळी निधी, अनुदान, कर्जमाफी प्रकणातील रक्कमा जिल्हा बॅंक सबंधित लाभार्थी शेतकरी यांच्या खात्यावर वर्ग न करता स्वतः वापरते. जिल्हा बॅंकेतील सात शाखेत कोट्यवधीचा घोटाळा झाला. त्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाठबळाशिवाय शक्य नाही.

 

विटा येथील विश्वकर्मा प्लायवूड सेंटर खरेदीची चौकशी करा. मुख्यालय, फर्निचर खरेदी, भ्रष्टाचाराची चौकशी करा. जमिन तारण मुद्रांकांचही घोटाळा केला आहे. सांगलीतील स्वप्नपुर्ती शुगर तर कागदोपत्री असलेली कंपनी आहे. कागदोपत्र नसताना एकाच दिवशी २३ कोटचे कर्ज मंजूर होते. तेच कर्ज वसंतदादाची थकबाकी रक्कम भरण्यासाठी वापरले गेले. त्यामुळे यात भ्रष्ट्राचार झाला आहे. त्यामुळे मंगळवार दिनांक २५ रोजी सकाळी अकरा वाजता स्टेशन चौकातून मोर्चाला सुरुवात होणार असून या मोर्चाला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.