
२३ हजार हेक्टरवरील पिके उध्वस्त; शेतकरी हवालदिल
माणदेश एक्सप्रेस न्यूज |पुणे
राज्यात गेल्या बारा दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले असून २३ जिल्ह्यांतील तब्बल २३ हजार ३३१ हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. भाजीपाला, फळबागा व उन्हाळी हंगामातील मुख्य पिके पावसाने नेस्तनाबूत केली आहेत. या अनपेक्षित संकटामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक डोंगर कोसळला असून, सरकारकडून तातडीने मदतीची अपेक्षा व्यक्त होत आहे.
भारतीय हवामान खात्याने पुढील दोन दिवसांसाठीही अवकाळीचा इशारा दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात पिके मोठ्या प्रमाणावर झोपली आहेत.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, केळी, आंबा, डाळिंब, पपई, चिकू, कांदा, मका, बाजरी, भाजीपाला व उन्हाळी भात यासारख्या पिकांचे नुकसान सर्वाधिक झाले आहे.
अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक फटका बसला असून अचलपूर, भातकुली, चांदूरबाजार आणि चिखलदरा या तालुक्यांतील १० हजार ८८८ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.सद्यस्थितीत महसूल व कृषी विभागाचे कर्मचारी शेतांमध्ये जाऊन पंचनामे करत असून, नुकसानाचा अहवाल लवकरच राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
जिल्हानिहाय नुकसान (हेक्टरमध्ये):
अमरावती – १०८८८, जळगाव – ४३९६, नाशिक – १७८७, जालना – १६९५, चंद्रपूर – १०३८, पालघर – ७९६, धुळे – ६४५,पुणे – ४८०, गडचिरोली – ३४२,इतर जिल्ह्यांतही लक्षणीय नुकसान
शेतकरी बांधव संकटात असताना, शासनाने तत्काळ मदतीचे पावले उचलावीत, अशी मागणी सर्वत्र होऊ लागली आहे.