माणदेश एक्सप्रेस न्युज :
विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईमधील माहीम मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या काही तास आधी अर्ज दाखल केला. या मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळेच लोकसभेला नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी आपला महायुतीला बिनशर्त पाठींबा असेल असं जाहीर करणाऱ्या राज ठाकरेंच्या पुत्रासाठी महायुती समर्थन देण्यास सकारात्मक भूमिकेत होती.
महायुतीचे वरिष्ठ नेते अमित ठाकरेंना समर्थन देण्यासाठी साकारात्मक भूमिकेत होते तरीही मागील अनेक वर्षांपासून महीममधून निवडून येणारे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी निवडणूक लढवणारच आणि यावर आपण ठाम असल्याचं वरिष्ठांना कळवलं. अखेरच्या दिवसापर्यंत सदा सरवणकर उमेदवारी अर्ज भरणार की नाही याबद्दल सस्पेन्स कायम होता. मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. असं असतानाच आता दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीसांनी सरवणकर लढतीलच हे निश्चित नसल्याचे संकेत दिले आहेत.
मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांसी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांना अमित ठाकरेंना पाठिंबा देण्यासंदर्भात महायुतीची भूमिका काय आहे यासंदर्भात विचारणा केली. त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी, “अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबत मुख्यमंत्री यांची देखील मान्यता होती. परंतु काही अडचणी आल्या. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचे म्हणणं होत की तसं झालं की मतं उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे जातील,” असं सांगितलं.
तसेच सदा सरवणकरांनी उमेदवारी अर्ज भरला असला तरी ते निवडणूक लढवतील असं निश्चित नसल्याचे सूचक संकेत फडणवीस यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिले. सदा सरवणकरांसंदर्भात बोलताना, “सदा सरवणकर माघार घेणार का हे आम्ही ठरवू बैठकीत,” असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.