‘फडणवीस एकटे नाहीत, आम्ही त्यांच्यासोबत’ भाजपचे खासदार नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा

0
189

देवेंद्र फडणवीस हे एकटे नाहीत, आम्ही त्यांच्या सोबत आहोत, भाजप आणि आरएसएस त्यांच्यासोबत आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आव्हान देण्याची भाषा करू नये असा इशारा माजी केंद्रीय नेते आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चॅलेंज करण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही अशी टीकाही त्यांनी केली. नारायण राणे यांनी सोशल मीडियावरून ही भूमिका मांडली आहे.

उद्धव ठाकरे, तुम्ही वाकड्यात शिरला तर तुम्हाला तसंच उत्तर दिलं जाईल. आपले मुख्यमंत्रीपद हे महाराष्ट्रासाठी कलंक होते, आपल्या कारकीर्दीत महाराष्ट्र दहा वर्षे मागे गेला असं नारायण राणे म्हणाले.

अनेक अडचणींना तोंड देऊन मी पुन्हा उभा राहिलोय, आता यापुढे एक तर तू राहशील नाहीतर मी राहीन असं जाहीर आव्हान उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं. तसेच येत्या विधानसभेला मोदींची उरलीसुरली उर्मीही काढतो असंही ते म्हणाले होते. त्यावर नारायण राणे यांनी टीका केली आहे.

काय म्हणाले नारायण राणे?
उद्धव ठाकरे यांची माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चॅलेंज देण्याची औकात व लायकी नाही. लोकशाहीमध्ये निवडणुकीत जागा कमी जास्त होतात. भाजपने काही पहिल्यांदा निवडणूक लढलेली नाही. माननीय नरेंद्र मोदीजी अनेक निवडणुकांना सामोरे गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना घाम फुटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

माननीय नरेंद्रजी मोदींब‌द्दल हे वाक्य उदगारताना जनाची नाही तर मनाची तरी ठेवावी. उद्धव वाकड्यात शिरले तर वाकडेपणाला चोख उत्तर देवून भाजप सरळ केल्याशिवाय राहणार नाही. राजकारणातील माणसे षंढ आहेत असे आपण म्हणालात. आपण आत्मपरीक्षण करा, षंढ शब्दाचा अर्थ कोणाशी जवळीक साधतो.

आपले मुख्यमंत्रीपद हे महाराष्ट्रासाठी कलंक होते. आपल्या अडीच वर्षाच्या कालावधीत विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र 10 वर्ष मागे गेला. तेव्हा लोक म्हणायचे अडीच वर्षात दोनदा मंत्रालयात जाणाऱ्या मुख्यमंत्र्याची कीव करावीशी वाटते.

काही झाले तरी आपले स्वप्न आम्ही पुरे होवू देणार नाही. भविष्यकाळात महाराष्ट्रात कोण राहील हे महाराष्ट्राची जनता ठरवेल. स्वःतचे कौतुक करून घेवून आपण अडीच वर्षात भीम पराक्रम केल्याच्या फुशारक्या मारत आहात त्याला लवकरच चोख उत्तर देऊ. एक लक्षात ठेवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकटे नाहीत. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. भाजप आणि आरएसएस त्यांच्या सोबत आहे. मातोश्रीत बसून धमकीची भाषा षंढच करू शकतो.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here