
माणदेश एक्सप्रेस/मुंबई : आम्ही हा अर्थसंकल्प केवळ चालू वर्षाचा विचार करून तयार केलेला नाही. तर पुढील पाच वर्षांचा विचार करून तयार केला आहे. या ५ वर्षांत कुणी गमतीने जरी म्हटले की, अमक्या-तमक्याने मुख्यमंत्री व्हा आणि पाठिंबा देतो. तरी ते काही शक्य नाही. तुमच्याकडे आमदारच नाहीत तर तुम्ही पाठिंबा कसला देणार? १० ते २० टाळकी असताना हे आम्हाला पाठिंबा देणार का, अशा खोचक शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत टोलेबाजी केली.
अर्थसंकल्पावरील चर्चेला अजित पवार यांनी उत्तर दिले. यावेळी अनेक मुद्द्यांवर अजित पवार यांनी विरोधकांवर पलटवार केला. चर्चेला उत्तर देताना अजित पवारांनी आमदारांना टाळकी हा शब्द वापरला. याला ठाकरे गटाचे सदस्य भास्कर जाधव यांनी आक्षेप घेत टाळकी म्हणू नका, असे म्हटले. त्यावरही अजित पवार म्हणाले की, मी आमदारांना नेहमीच सन्माननीय सदस्य म्हणत असतो. पण विरोधक ज्या पद्धतीने बोलत आहेत, त्यावर ही प्रतिक्रिया होती. पण मी एक एक सांगतो, पाच वर्षांत ब्रह्मदेव आला तरी या सरकारला कुणी धक्का लावू शकत नाही, असा ठाम विश्वास अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, या अर्थसंकल्पात मागील वर्षीच्या काही योजना बंद केल्याचे प्रसारमाध्यमे दाखवत होती. सभागृहात काही सन्माननीय सदस्यांनी याचा उल्लेख केला. मला तुम्हाला सांगायचे आहे की, काही योजना या त्या-त्या वेळी उद्भवलेल्या परिस्थितीनुसार सुरू केल्या जातात. सर्वच योजनांचे वेळोवेळी पुनर्विलोकन होत असते. ज्या योजना कालबाह्य ठरतात, त्या बंद कराव्या लागतात, असे अजित पवार म्हणाले. लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांना प्रश्न विचारायचा होता. अजित पवार यांनी या योजनेचे नाव घेतले नसले तरी महायुती सरकारने सुरू केलेल्या कोणत्याही योजना बंद करणार नसल्याचे सांगितले.