
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : मिरज तालुकास्तरीय संजय गांधी योजना समितीच्या दि. 27 जानेवारी 2025 व दि. 21 मार्च 2025 रोजी बैठकीमध्ये श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेतील 442, संजय गांधी निराधार योजना मिरज ग्रामीण 470, संजय गांधी निराधार योजना मिरज शहर 193 असे एकूण 1 हजार 105 नव्या लाभार्थींना नव्याने योजनेचा लाभ देण्यात आला आहे.
सामाजिक अर्थसहाय्य योजनेच्या लाभासाठी मिरज तालुक्यातील पात्र लाभार्थींनी गावचे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे अर्ज सादर करावेत, जेणेकरुन तालुक्यातील एकही पात्र लाभार्थी शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असे मिरज तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
महसूल विभागाच्या 100 दिवस कृती कार्यक्रमात पारदर्शक, गतिमान लोकभिमुख प्रशासन नागरिकांना उपलब्ध करण्यासाठी कार्यालयीन गतिमानता अभियान अंतर्गत सुकर जीवनमान या घटकामध्ये नागरी सेवांचे सुलभीकरण करण्याच्या अनुषंगाने मिरज तालुक्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत अभियान कालावधीमध्ये ग्राम महसूल अधिकारी यांच्यामार्फत गावामध्ये ज्या पात्र नागरिकांनी सामाजिक अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेतलेला नाही, अशा लाभार्थी यांची शोध मोहीम राबविण्यात आली. संबंधितांचे अर्ज प्राप्त करुन स्थानिक चौकशी करण्याची कार्यवाही विशेष शिबीर राबवून पूर्ण करण्यात आली. त्याअंतर्गत तालुकास्तरीय समिती मार्फत दि. 27 जानेवारी 2025 व दि. 21 मार्च 2025 रोजी संजय गांधी योजना समितीची बैठक घेण्यात आली असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.