
माणदेश एक्सप्रेस न्युज | आग्रा :
सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षिततेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होईल अशी हृदयद्रावक घटना मंगळवारी (१६ सप्टेंबर २०२५) पहाटे आग्र्यात घडली. चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरला अचानक लागलेल्या आगीत एक वृद्ध दाम्पत्य होरपळून मृत्युमुखी पडलं. तर त्यांची १४ वर्षीय नात थोडक्यात बचावली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, स्थानिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृतांमध्ये भगवती प्रसाद (वय, ९५) आणि त्यांची पत्नी उर्मिला देवी (वय, ८५) यांचा समावेश आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री दीडच्या सुमारास त्यांचा मुलगा प्रमोद यांनी ई-स्कूटर घराच्या तळमजल्यावर चार्जिंगला लावली होती. काही वेळातच स्कूटरच्या बॅटरीत स्फोट झाला आणि तळमजल्यावरून सुरू झालेली आग संपूर्ण घरभर पसरली.
धुरामुळे झोपेतून जागी झालेल्या १४ वर्षीय नातीने प्रसंगावधान दाखवत पहिल्या मजल्यावर झोपलेल्या आपल्या आई-वडिलांना हाका मारल्या. नंतर शेजारीही घटनास्थळी धावले. आग लागल्याची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दल तातडीने दाखल झाले.
एसीपी मयंक तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस पथकाने कुटुंबातील इतर सदस्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवलं. मात्र, आग विझवण्यापूर्वीच भगवती प्रसाद यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर अवस्थेत बाहेर काढलेल्या उर्मिला देवी यांचा दीड तासानंतर उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.
या स्कूटरवर अजूनही कंपनीची वॉरंटी असल्याचा दावा प्रमोद यांनी केला आहे. तसेच, या अपघाताला कंपनी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी पोलिसांसमोर केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अलीकडच्या काळात इलेक्ट्रिक वाहनांबाबत सुरक्षिततेचे प्रश्न वारंवार उपस्थित होत आहेत. विशेषतः चार्जिंगदरम्यान लागणाऱ्या आगीच्या घटनांनी ग्राहकांच्या चिंतेत भर घातली आहे. आग्रा येथे घडलेल्या या दुर्दैवी अपघातामुळे ई-स्कूटर वापरणाऱ्यांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.