
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर आणि केंद्र सरकारवर थेट हल्ला चढवला आहे. “मध्य प्रदेशात ज्या EVM मशीनवर घोटाळा झाला, तीच यंत्र महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत”, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे.
“निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांचा गुलाम बनलाय. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत EVM वापरणार पण VVPAT बसवणार नाहीत, म्हणजे मत दिलं तरी मतदाराला कळणार नाही त्याचा मताचा उपयोग कुणासाठी झाला ते. मग निवडणूक घेण्याचा काय अर्थ?” असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले की, “जर मतमोजणीत वेळ लागतो म्हणून VVPAT लावायची नसेल, तर सरळ मतपत्रिकेवर निवडणूक घ्या. पण ईव्हीएम कुठून आणणार आहेत? मध्य प्रदेशातून. जिथे सर्वात मोठा EVM घोटाळा झाला.”
दिल्लीचे ‘गवतावर बसणारे’ नेते
संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावरही जोरदार टीका केली. “शिंदे गटाचे नेते दिल्लीत जाऊन बसतात. दिल्लीला भेटीसाठी वाट पाहावी लागते, गवतावर बसावं लागतं, आणि शेवटी गवतच लावून मुंबईला परत यावं लागतं – हा दिल्लीचा इतिहास आहे,” अशी टोकदार टिप्पणी त्यांनी केली.
“शिंदे दिल्लीला गेले, त्यात विशेष काही नाही. त्यांचा पक्ष दिल्लीपुरताच मर्यादित आहे. भाजपच्या हाय कमांडला भेटण्यासाठी रात्री अपरात्री रांगेत थांबावं लागतं.”
‘दिल्लीमध्ये काहीतरी मोठं होणार’
सध्याच्या राजकीय हालचालींवर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, “राहुल गांधी वारंवार सांगतात की ‘बडा खेला’ होणार आहे. तो महाराष्ट्रात नाही, दिल्लीमध्ये होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी घडण्याइतकी मोठी माणसं सरकारमध्ये नाहीत. सध्याचं सरकार हे ‘कृत्रिम’ आहे.”
ते पुढे म्हणाले, “भाजपमुळे महाराष्ट्राच्या महान राजकीय परंपरेला ग्रहण लागलं आहे. सध्याचं राज्य सरकार ही सत्ता नव्हे, ती दिल्लीची बाहुली आहे.”