
माणदेश एक्सप्रेस न्यूज| मुंबई :-
महाराष्ट्रात आणि दिल्लीमध्ये आज विरोधकांच्या दोन महत्त्वाच्या आंदोलनांची जोरदार चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने राज्यभरात जनआक्रोश आंदोलन हाती घेतले असून, महायुतीतील कलंकित आणि भ्रष्ट मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात येत आहे. त्याच वेळी, इंडिया आघाडीने केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात दिल्लीमध्ये मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
राऊतांचा संतप्त स्वर
या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर तीव्र शब्दांत हल्ला चढवला. “निवडणूक आयोग म्हणजे दुतोंडी गांडूळ आहे. आयोगावर आमचा स्वतःचा विश्वास नाही,” असे म्हणत त्यांनी आयोगाचे सरकारच्या दबावाखाली काम करणारे हस्तक असल्याचा आरोप केला.
राऊत म्हणाले, “आज संसद भवनापासून ते निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा निघणार आहे. महाराष्ट्रापासून बिहारपर्यंत मतदार याद्यांतील घोटाळे उघड झाले आहेत. ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विरोधकांचा आवाज दाबणे, लोकशाहीची पायमल्ली करणे हे आयोगाचे वर्तन झाले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष जाऊन आम्हाला आयोगाला जाब विचारावा लागणार आहे. हा मोर्चा जनजागृतीसाठी असून, लोकांना सत्य कळले पाहिजे.”
“शिवसेनेचे नाव-चिन्ह चोरले”
राऊतांनी आयोगावर आणखी एक गंभीर आरोप करताना म्हटले, “शिवसेनेचे नाव आणि चिन्ह चोरून दुसऱ्या गटाला दिले गेले, हे आम्ही प्रत्यक्ष पाहिले आहे. महाराष्ट्रात आम्ही आयोगाला पुरावे दिले, पण कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आयोग भाजपचा प्रवक्ता आहे यात शंका नाही.”
फडणवीसांवर थेट प्रहार
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर थेट निशाणा साधताना राऊत म्हणाले, “फडणवीस हे निवडणूक आयोगाच्या दरोड्यातील लाभार्थी आहेत. त्यांच्या हातात चोरीचा माल आहे, त्यामुळे आयोगाची बाजू त्यांनी घेणे साहजिक आहे. चोराने गप्प राहिले पाहिजे, पण ते प्रवक्त्याची भूमिका निभावत आहेत.”
आंदोलनांमुळे तापलेले वातावरण
उद्धव ठाकरे आज महाराष्ट्रातील आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत, तर दिल्लीत इंडिया आघाडीच्या मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल कॉंग्रेससह इतर पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. दुसरीकडे, भाजप सत्ताधारी राज्यांतील काँग्रेसविरोधी आंदोलन करत असून, सत्ताधारी व विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे.