
पुणे (प्रतिनिधी) – सध्या महाराष्ट्रात मराठी भाषा, अस्मिता आणि हिंदी सक्तीवरून वातावरण चांगलंच तापलेलं असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात ‘जय गुजरात’ असा नारा दिल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. भाषावाद आणि अस्मितेच्या चर्चेत असताना, एका मराठी नेत्याकडून अशा प्रकारचं विधान झाल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
काय घडलं नेमकं?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. कोंढवा परिसरात गुजराती समाजाकडून उभारण्यात आलेल्या जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात ते उपस्थित होते. याच कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण करताना, “धन्यवाद, जय महाराष्ट्र” असं म्हणत भाषण संपवलं.
मात्र भाषण संपवून खाली उतरत असताना, त्यांनी मंचावरच वळून ‘जय गुजरात’ असा नारा दिला. विशेष म्हणजे, त्यांच्या या घोषणेला केंद्रीय मंत्री अमित शाह उपस्थित असताना दिलेला असल्याने, त्याला अधिक राजकीय वजन प्राप्त झालं आहे.
मराठी अस्मिता विरुद्ध भाषावादात नव्या वळणाची शक्यता
अलीकडेच मीरारोडमधील मराठी बोलण्यावरून झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर राज्यभरात मराठी विरुद्ध अमराठी वाद रंगला होता. अशातच शिंदे यांच्या ‘जय गुजरात’ घोषणेने पुन्हा एकदा मराठी अस्मिता आणि भाषिक असंतोषाचा मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.
राजकीय प्रतिक्रिया येण्याची शक्यता
एकनाथ शिंदे हे स्वतः ‘मराठी माणसाच्या हक्कांसाठी’ लढा देणारा नेता असल्याचा दावा करतात. मात्र पुण्याच्या भूमीत ‘जय गुजरात’चा नारा देणं हे अनेक मराठी समर्थक आणि विरोधकांच्या रोषाला कारण ठरू शकतं.
मनसे, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांसारख्या पक्षांकडून यावर तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सामाजिक माध्यमांवरही याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
संदर्भ महत्त्वाचा का?
हे स्पोर्ट्स सेंटर गुजराती समाजाकडून उभारलेलं असल्यामुळे, ‘जय गुजरात’ हा नारा फक्त समुदायासाठी केलेला सन्मान दर्शवतो, असं शिंदे समर्थक सांगत आहेत. मात्र मराठी अस्मिता आणि सध्या सुरु असलेल्या भाषावादाच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा ‘अवाजवी आणि असंवेदनशील’ असल्याचा सूर काही ठिकाणी उमटतो आहे.