
माणदेश एक्सप्रेस न्यूज |
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा दिल्लीच्या राजकीय दौऱ्यावर गेले असून, यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याचे निश्चित झाले आहे. दुपारी १ वाजता शाह यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार असून, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींशीही ते चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
महत्त्वाच्या मुद्द्यांवर बैठक
या बैठकीत आगामी महानगरपालिका निवडणुका, युतीतील जागावाटप, तसेच शिवसेनेतील नाराजी आणि आगामी उपराष्ट्रपती निवडणूक अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये लवकरच काही बदल होऊ शकतात. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची दिल्ली भेट राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
टीकाकारांवर सामंतांचा पलटवार
या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) नेते मंत्री उदय सामंत यांनी शिंदेंवर टीका करणाऱ्यांना चपराक दिली आहे.
“एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये गेले म्हणजे काहीतरी गुप्त चाल आहे, असं म्हणणारे आता राहुल गांधींसोबत जेवायला दिल्लीला जात आहेत. मग त्यावर कोणी काही बोलत नाही,” असा प्रश्न सामंत यांनी उपस्थित केला.
त्यांनी पुढे म्हणाले, “UBT सेनेने आत्मपरीक्षण करावं. ते आजही काँग्रेसच्या तालावर नाचतात. सत्तेत नसतानाही त्यांचा दिल्लीवर इतका प्रभाव आहे, तर आम्ही सत्तेत आहोत, आम्ही विकासासाठी निधी मागायला दिल्लीला जातो, त्यावर टीका योग्य नाही.”
‘वाट पाहा, काहीतरी मोठं होणार!’
राज्यातील भाजप-शिवसेना युतीतील नाराजी, आगामी निवडणुकांचे समीकरण, शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी होणाऱ्या संभाव्य बदलांमुळे या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर, आगामी काही दिवसात महत्त्वाची राजकीय घोषणा किंवा फेरबदल होण्याची शक्यता अनेक राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.