
माणदेश एक्सप्रेस/मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदेंच्या नाराजीचे तर्क लावले जात आहेत. सत्ताधारी गटात एकनाथ शिंदेंची शिवसेना नाराज असल्याचं बोललं जात आहे. यावरून अनेक अंदाज बांधले जात असतानाच एकनाथ शिंदे मंगळवारी संध्याकाळी उशीरा थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी दाखल झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. या दोघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाल्यानंतर दोन्ही बाजूच्या नेतेमंडळींनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
आधी लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकांवेळी मनसेचा महायुतीमध्ये प्रवेश होण्याची जोरदार चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. मात्र, या दोन्ही निवडणुकांमध्ये मनसे महायुतीमध्ये सहभागी झाली नाही. आता सर्वच राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. मुंबई महानगर पालिकेची निवडणूक सत्ताधारी व विरोधी अशा दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठेची केली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुणाच्या पाठीशी उभी राहणार? की स्वतंत्रच लढणार? यावर समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.
मंगळवारी रात्री उशीरा राज ठाकरे व एकनाथ शिंदे यांची भेट झाली. एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी दोघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. यानंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं विधान केलं. “आता पुन्हा निवडणुकांना खूप वेळ आहे. त्यामुळे निवडणुकांवर चर्चा करण्याची आत्ता वेळ नाही. निवडणुकांचा माहौल तयार होतो तेव्हा युती वगैरेच्या चर्चा सुरू होतात. त्यामुळे ही फक्त सदिच्छा भेट होती”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.