साडेअकरा कोटी फसवणुकीतील आठ संशयित पोलिसांच्या ताब्यात

0
218

माणदेश एक्सप्रेस न्यूज|कोल्हापूर : शहरातील सेवानिवृत्त प्राध्यापिका आणि ज्येष्ठ नागरिकास त्यांच्या बँक खात्यांचा गैरवापर झाल्याची भीती घालून साडेअकरा कोटी रुपये हडप केल्याप्रकरणी पोलिसांनी ८ संशयितांना ताब्यात घेतले आहे. राजारामपुरी आणि जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या दोन्ही गुन्ह्यांमध्ये साधर्म्य असल्याने संयुक्त तपास सुरू आहे. लवकरच सायबर गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश होईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिली.

 

सम्राटनगर येथील निवृत्त प्राध्यापिका मीना डोंगरे यांना डिजिटल अरेस्ट करण्याची भीती घालून सायबर गुन्हेगारांनी ३ कोटी ५७ लाखांचा गंडा घालता. देवकर पाणंद येथील ज्येष्ठ नागरिक दत्तात्रय पाडेकर यांच्याकडून बँक खात्यांचा गैरवापर झाल्याची भीती घालून ७ कोटी ८६ लाख रुपये उकळले होते.

 

 

सायबर गुन्हेगारांकडून वापरली जाणारी बँक खाती देशभरातील खातेदारांची आहेत. यातील बहुतांश खाती ५ ते २५ हजारांचे आमिष दाखवून काढली आहेत. मूळ खातेदाराला त्याच्या बँक खात्यावरील व्यवहारांची कल्पनाच नसते. पोलिसांची नोटीस मिळाल्यानंतरच त्यांना हा प्रकार लक्षात येतो. पोलिसांच्या तपासात अशी अनेक बनावट खाती समोर आली आहेत.

 

ऑनलाइन आर्थिक फसवणुकीसाठी वापरली जाणारी बँक खाती काढण्यासाठी काही एजंट सक्रिय आहेत. ५ ते २५ हजार रुपये देऊन ते जिल्ह्यातील तरुणांच्या कागदपत्रांचा वापर करून बँक खाती काढतात. अशा खात्यांना सायबर गुन्हेगारांचा नंबर जोडला असल्याने मूळ खातेदाराला त्यावरील व्यवहारांची काहीच कल्पना येत नाही. शहरात अनेक तरुणांना उत्तरप्रदेश, कर्नाटक पोलिसांच्या नोटिसा आल्या असून, त्यांना चौकशीसाठी बोलवले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here