माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर ईडीची कारवाई; १२ ठिकाणी छापे, १८ तासांची तपास मोहीम, १.२५ कोटींची रोख रक्कम जप्त

0
177

माणदेश एक्सप्रेस न्यूज | वसई –

वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालय (ईडी) कडून थेट कारवाई करत तब्बल १२ ठिकाणी छापे टाकण्यात आले. तब्बल १८ तास चाललेल्या या कारवाईनंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. या तपासात महत्त्वाचे कागदपत्रे, हार्ड डिस्क आणि १ कोटी २५ लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

 

 

ईडीकडून बुधवारी सकाळी ७ वाजता ही मोहीम सुरू झाली आणि ती रात्री दीड वाजेपर्यंत चालली. माजी आयुक्त पवार यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांच्या निवासस्थानी व कार्यालयांवरही तपास झाला. चौकशीत कुणालाही ताब्यात घेण्यात आले नसले तरी काही डिजिटल डिव्हाइसेस आणि आर्थिक दस्तावेज जप्त करण्यात आले.

 

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी लपवून ठेवलेली १.२५ कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली. याशिवाय, नाशिकमधील पांडवलेणी परिसरातील एक भूखंडही चौकशीच्या कक्षेत आला असून, तो अनियमित पद्धतीने त्यांच्या नावे केल्याचा संशय आहे. हा भूखंड ४१३ चौरस मीटरचा असून, तो निसर्गरम्य ठिकाणी वसलेला आहे.
ईडीने आधीच या भूखंडावर कागदोपत्री जप्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. या कारवाईदरम्यान सटाणा येथील इतर मालमत्तांचीही चौकशी सुरू झाली आहे. ईडीच्या मते, प्रशासकीय पदाचा गैरवापर करत अनेक आर्थिक गैरव्यवहार करण्यात आले असावेत, असा संशय असून, एसआयटीमार्फत सखोल चौकशीची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

दरम्यान, या कारवाईनंतर राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. खासदार संजय राऊत यांनी थेट मंत्री दादा भुसे यांच्यावर आरोप करत पुन्हा एकदा राजकीय तापमान वाढवले आहे. ईडीच्या पुढील तपासात आणखी नावे आणि मालमत्तांचे धागेदोरे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here