
माणदेश एक्सप्रेस न्यूज|पुणे – वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील फरार असलेले दोन मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. सात दिवसांच्या शोधानंतर गुरुवारी (दि. २२ मे) पहाटे साडेचारच्या सुमारास पिंपरी चिंचवड पोलिसांनी राजेंद्र हगवणे (वैष्णवी हगवणे यांचे सासरे) आणि सुशील हगवणे (दीर) यांना अटक केली. विशेष पथकाने सापळा रचून ही धडक कारवाई केली.
या प्रकरणात वैष्णवीच्या सासू, पती आणि नणंद यांना यापूर्वीच अटक झाली आहे. आता सासरा आणि दीर अटकेत आल्यानंतर चौकशीला अधिक वेग आला असून, या प्रकरणातील अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वैष्णवी हगवणे यांचा मृत्यू त्यांच्या सासरी संशयास्पद परिस्थितीत झाला होता. मृत्यूआधी त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे. या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली असून, न्याय मिळावा यासाठी अनेक ठिकाणी आवाज उठवला जात आहे.
फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले होते. अखेर गुरुवारी पहाटे त्यांच्या हत्यारबंद पथकाने धाड टाकून दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांकडून सर्व आरोपींविरुद्ध ठोस पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून, लवकरच या प्रकरणात नवे तपशील उजेडात येण्याची शक्यता आहे.