
माणदेश एक्स्प्रेस/पुणे : भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर (नसरापूर) येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या पवित्र देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही शासन आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे उपोषणाला सुरुवात केली होती. जोपर्यंत रस्त्याच्या कामाची तारीख सांगत नाही. तोपर्यंत उपोषण सुरु राहणार असल्याचे सुळे यांनी सांगितले होते. अखेर त्यांनी 2 मे ला कामाला सुरुवात करण्याच्या कबुलीवर सुप्रिया सुळे यांनी उपोषण सोडले आहे. त्यानंतर भोरमध्ये सरकारने कामे केली तर आंदोलन करावे लागणार नाही, असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
ब्राह्मणघर (ता. भोर) येथील रस्ता भूमिपूजन समारंभ व नऱ्हे येथील मंदिर पाहणी दरम्यान खा. सुळे बोलत होत्या. रस्त्याच्या कामावरून उपोषणाला बसण्याचा इशारा मी सरकारला दिला होता. पण त्यानंतरही या प्रकरणाची दखल घेतली गेली नाही. अखेर मला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसावे लागले. सरकारच्या नाकर्त्या भूमिकेमुळे उपोषण करावे लागते. सरकारने कामे केली तर आंदोलन करावे लागणार नाही, असे असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
सुप्रिया सुळेंनी उपोषण केल्यानंतर अजित पवारांनी तातडीने दखल घेतली आहे. रस्त्याचे काम तातडीने चालू होईल. सूचना दिलेल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी बोललो आहे. पीएमआरडीएचे भिसे म्हणून प्रमुख आहेत, त्यांच्याशीही बोललोय. ड्युटी कलेक्टरशी बोललोय; त्यांना म्हणलं, ६०० मीटरचा रस्ता आहे. आता परत कुणालाही तिथं उपोषण करण्याची पाळी येता कामा नये. माझ्या बहिणीला पण येता कामा नये आणि इतर कुठल्या नागरिकांना पण येता कामा नये. आता तो रस्ता झालाच पाहिजे. त्या कामाला यंत्रणेला लावलेलं आहे आणि निधी कमी पडू दिला जाणार नाही”, अशी माहिती अजित पवारांनी दिली. (स्रोत-लोकमत)