नांदेड जिल्ह्यातील मुगाव तांडा गावात विहिरीचे दूषित पाणी प्यायल्याने ९३ जणांना पोटात संसर्ग झाला आहे, अशी माहिती सोमवारी समोर आली. मुगाव तांडा गावात ही घटना घडली असून गावातील मोठ्या माणासोबत लहान मुलांनाही पाणी बादले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी बालाजी शिंदे यांनी पीटीआयला सांगितले की, 26 आणि 27 जून रोजी ओटीपोटात दुखणे आणि मळमळ होत असल्याच्या तक्रारी त्यांच्यासमोर आल्या. या तक्रारींमध्ये 93 स्थानिकांचा समावेश होता.
एकाच वेळी अनेक जण आजारी पडल्यामुळे ग्रामस्थांनी आरोग्य केंद्राशी संपर्क साधला. सध्या बाधितांवर उपचार सुरू आहेत. मुगाव तांडा गावात ५६ रुग्णांवर उपचार करण्यात आले, तर ३७ रुग्णांना शेजारच्या मांजरम गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले, बरे झालेल्यांना घरी सोडण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
मुगाव तांडा गावात डॉक्टरांचे एक पथक तैनात होते, असे अधिकाऱ्याने सांगितले. ‘आम्ही एक सर्वेक्षण केले आणि संसर्गाचा संभाव्य स्त्रोत ही एक विहीर होती. जिथून गावकऱ्यांना पाणीपुरवठा केला जातो. विहीर सील करण्यात आली आहे आणि गावकऱ्यांना जवळच्या फिल्टर प्लांटमधून पाणी उपलब्ध करून दिले जात आहे,’ असे ते म्हणाले.