
Viral video : मोठेपणी तुला काय व्हायचं आहे असे विचारल्यावर आपल्याकडे स्वप्नांची यादीच तयार असायची. मालिका, चित्रपटात पाहिलेल्या अनेक भूमिका मनात बसायच्या आणि मग हेच मला मोठेपणी व्हायचं आहे असे आपण लहानपणी स्वप्न उराशी बाळगायचो. तर काही जण लहानपणी पाहिलेले स्वप्न पूर्ण करतात तर अनेक जण वेगळा मार्ग निवडतात. तर आज अशाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, यामध्ये चिमुकल्याला मोठेपणी दिग्दर्शक (Filmmaker) बनायचे आहे.
व्हायरल व्हिडीओत एक अज्ञात व्यक्ती काही चिमुकल्यांचा व्हिडीओ शूट करत आहे. त्यातील एका चिमुकल्याला विचारते की, ‘तूला मोठेपणी काय करायचं आहे’. यावर चिमुकला ‘मी खूप काही करणार आहे’ असे सहज बोलून जातो. ‘खूप काही म्हणजे नेमकं काय’ असे अज्ञात व्यक्ती म्हणते. यावर चिमुकला ‘नोकरी किंवा सिनेमा (फिल्म) बनवणार’ असे बोलतो.
तसेच या सिनेमात अज्ञात व्यक्ती आणि बाजूला उभ्या असणाऱ्या दोन्ही मुलींना सुद्धा घेणार असे सुद्धा आवर्जून म्हणतो.
त्यानंतर अज्ञात व्यक्ती त्याचे कौतुक करण्यास सुरुवात करते.पण, इथेच व्हिडीओमध्ये मजेशीर ट्विस्ट येतो. ‘तुझ्या सिनेमात हिरो कोण असणार’ असे शेजारी उभी असणारी चिमुकली विचारते. त्यानंतर चिमुकला अज्ञात व्यक्तीकडे इशारा करून म्हणते ‘हा काय माझ्या सिनेमाचा हिरो’. पण, त्यानंतर आपल्या मैत्रिणीची थट्टा करण्यासाठी ‘तुला या सिनेमात काय करायचं आहे माहिती आहे का’ तर आश्चर्याने ‘काय’ विचारते. त्यानंतर चिमुकला म्हणतो ‘तुला पाण्यात हळूहळू उतरायचं आहे’. पण ‘का’ असे पुन्हा एकदा मैत्रीण विचारते. त्यावर चिमुकला म्हणतो सिनेमा बनवणार तर त्याचे नाव तर ठेवावं लागणार ना ‘गयी भैंस पानी में’ असे अगदी मजेशीर पद्धतीने म्हणतो आणि जमलेल्यांमध्ये एकच हशा पिकतो.