
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई :
साताऱ्यातील फलटण येथे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येने राज्यातील वैद्यकीय क्षेत्राला हादरा बसला आहे. एकीकडे समाजाला वाचवणाऱ्या डॉक्टर मुलीनेच आयुष्य संपवल्याने जनमानसात वेदना आणि संताप आहे, तर दुसरीकडे या प्रकरणाच्या न्यायप्रक्रियेबाबत शंका उपस्थित करत राज्यभरातील डॉक्टर संघटनांनी आज आक्रमक भूमिका घेत कामबंद आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. मुंबईपासून छत्रपती संभाजीनगरपर्यंत अनेक सरकारी रुग्णालयातील सेवा ठप्प पडल्या आहेत. “बेटी पढ़ी पर बची नहीं”, “नो सेफ्टी, नो सर्विस” अशा घोषणांनी वैद्यकीय विद्यार्थी, रेसिडेंट डॉक्टर आणि संघटनांचा संताप उफाळून आला आहे.
फलटणमधील एका खासगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या नोटमध्ये त्यांनी दोन व्यक्तींची नावे नमूद केली असून त्यांना अटकही करण्यात आली आहे. परंतु तपास योग्य दिशेने न जात असल्याचा आरोप डॉक्टर संघटनांनी केला आहे. डॉक्टरांच्या मानसिक ताणतणावाबाबत, कार्यस्थळी सुरक्षिततेबाबत आणि त्रासाला सामोरं जाणाऱ्या महिला डॉक्टरांच्या संरक्षणाबाबतची यंत्रणा किती असुरक्षित आहे? असा प्रश्न आरोग्य यंत्रणेसमोर उभा राहिला आहे.
मुंबईतील नायर रुग्णालयात आज सकाळपासूनच डॉक्टरांनी मोठा मोर्चा काढला. गेट नंबर 1 परिसरात मोठ्या संख्येने रेसिडेंट डॉक्टर, एमडी विद्यार्थी जमले असून त्यांनी पोस्टर्स फडकावत आंदोलन सुरू केले आहे.
– “डॉ. मुंडे यांना न्याय मिळालाच पाहिजे”
– “नो सेफ्टी, नो सर्विस”
– “Enough is Enough”
अशा घोषणा देत डॉक्टरांनी ओपीडी सेवेला पूर्णपणे बंद पाडले आहे. केवळ इमर्जन्सी सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. आज फक्त ओपीडी बंद ठेवण्यात आली असली तरी, न्याय मिळाला नाही तर उद्यापासून इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करण्याचा इशारा डॉक्टरांनी सरकारला दिला आहे.
डॉक्टर संघटनांनी पुढील मागण्या केल्या आहेत –
प्रकरणाच्या तपासासाठी रिटायर्ड न्यायाधीश व महिला सदस्यांसह एसआयटी नेमावी
कौटुंबिक व कार्यस्थळावरील छळापासून डॉक्टरांना तात्काळ संरक्षण उपाययोजना
डॉक्टरांसाठी सुरक्षित कार्यपरिसर व कायदेशीर संरक्षक यंत्रणा
संपदा मुंडे यांच्या कुटुंबाला 5 कोटींची मदत
फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी
डॉक्टरांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी धोरणात्मक बदल
घाटी रुग्णालयात मराठवाडा रेसिडेंट डॉक्टर असोसिएशन (MARD) ने कामबंद आंदोलन पुकारले आहे. अत्यावश्यक सेवा सुरू ठेवून ओपीडी आणि इतर सर्व विभाग बंद करण्यात आले आहेत. रुग्णालयात आलेल्या रुग्णांना मोठी गैरसोय होत असून तातडीच्या ऑपरेशन्सही पुढे ढकलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालये, सरकारी रुग्णालये, जिल्हा रुग्णालयांमध्ये काम ठप्प झाल्याने अनेकांना उपचारांसाठी खाजगी रुग्णालयांचा पर्याय स्वीकारावा लागत आहे. आरोग्य विभाग व सरकार तातडीने हालचालीला लागले असून आंदोलन मागे घ्यावे यासाठी चर्चेचे प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
डॉक्टरांना सतत वाढलेला कामाचा ताण, सुरक्षेचा प्रश्न, प्रशासनाकडून सहानुभूतीचा अभाव, रुग्णांकडून होणारे आक्रमण यामुळे वैद्यकीय क्षेत्रात तणावाचे वातावरण आहे. “ज्यांनी जीव वाचवायचा त्यांनाच स्वतःचा जीव वाचवता येत नाही, ही व्यवस्था कुठे नेतेय?” असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
डॉ. संपदा मुंडे यांच्या मृत्यूने फक्त एक कुटुंब नाही तर संपूर्ण डॉक्टर समाज हलला आहे. राजकीय मंचांवरून महिलांच्या सक्षमीकरणाचे नारे दिले जातात, पण वास्तव वेगळंच दिसतंय – “बेटी पढ़ी, पर बची नहीं”.
आता सरकार काय भूमिका घेतं, तपासाला कोणती दिशा मिळते, डॉक्टरांच्या मागण्यांवर काय तोडगा निघतो याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.


