
वजन कमी करण्यासाठी अनेक जण विविध उपाय करतात. त्यातलाच एक लोकप्रिय उपाय म्हणजे कोमट पाण्यात मध आणि लिंबाचा रस टाकून पिणे. हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असल्याचे मानले जाते. अनेकांच्या मते, या पेयाने दिवसाची सुरुवात केल्याने चयापचय क्षमता वाढते, फॅट्स कमी होते आणि शरीर सुदृढ होते.
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आपण अनेकदा आरोग्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे वजनवाढीसारख्या समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. वजन कमी करण्यासाठी अनेक जण विविध उपाय करतात. त्यातलाच एक लोकप्रिय उपाय म्हणजे कोमट पाण्यात मध आणि लिंबाचा रस टाकून पिणे. हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असल्याचे मानले जाते.
“सकाळी उपाशीपोटी मध-लिंबूचा रस टाकून कोमट पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास, तसेच पचनास मदत होते आणि शरीराला पुरेसे पाणी मिळते; ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता जाणवत नाही. अति कॅलरीयुक्त पेये टाळून मध-लिंबाचे कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील एकूण कॅलरीजचे प्रमाण कमी होऊ शकते, तसेच चयापचय क्षमता वाढते आणि भूक कमी लागते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.”
लिंबामध्ये क जीवनसत्त्व आणि मधामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी हे पेय फायदेशीर आहे. “लिंबाचा रस पचनसंस्थेच्या कार्याला गती देतो आणि मध प्री-बायोटिक म्हणून काम करतो, जी बाब आतड्यांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्याशिवाय हे पेय शरीराला पाणी पुरवते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासही मदत करते.”
दिवसाची सुरुवात उपाशीपोटी चहाने करण्याऐवजी मधासह लिंबू पाणी सेवन करण्याने करा. तुमच्यासाठी हा एक आरोग्यदायी पर्याय ठरू शकतो. उपाशीपोटी चहा प्यायल्याने काही वेळा पचनक्रिया बिघडू शकते. मात्र, मध-लिंबाचे पाणी पचनास फायदेशीर असते आणि त्यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहते. या पेयाच्या सेवनाने शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते आणि त्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारून, उर्जेची पातळी वाढते.
“मधासह लिंबू पाणी हा वजन कमी करण्यासाठी चमत्कारिक उपाय नसला तरी संतुलित आहार आणि दिनचर्येतील तो एक महत्त्वाचा भाग ठरू शकतो. शरीरात साखरेचे सेवन टाळण्यासाठी मधाचे कमी प्रमाणात सेवन करणे गरजेचे आहे.”