दररोज योगा आणि ध्यान केल्याने खरंच बुद्धी तल्लख होते का?

0
63

माणदेश एक्सप्रेस न्यूज : आजच्या धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीत लोकांमध्ये विसराळूपणा, लक्ष न लागणे आणि स्मरणशक्ती कमी होण्याची समस्या झपाट्याने वाढत आहे. विद्यार्थी असोत, नोकरी करणारे असोत की घरातील जबाबदाऱ्या सांभाळणारे असोत – प्रत्येकालाच कधी ना कधी या समस्येला सामोरे जावे लागते. अशा वेळी अनेक जण औषधोपचारांकडे धाव घेतात. परंतु तज्ज्ञांच्या मते, दररोजचा योगा आणि ध्यान ही स्मरणशक्ती व एकाग्रता वाढवण्याची एक नैसर्गिक, सोपी आणि प्रभावी पद्धत ठरू शकते.

योग केल्याने शरीरात रक्ताभिसरण सुधारतो, ज्यामुळे मेंदूपर्यंत अधिक प्रमाणात ऑक्सिजन पोहोचतो. परिणामी, मेंदूतील पेशी सक्रिय राहतात. संशोधनात असे दिसून आले आहे की, नियमित योगामुळे मेंदूतील हिप्पोकॅम्पस भाग अधिक सक्रिय होतो. हाच तो भाग आहे जो शिकणे आणि लक्षात ठेवणे यासाठी जबाबदार असतो. त्यामुळे योगा करणाऱ्यांची स्मरणशक्ती अधिक तीक्ष्ण राहते. याशिवाय, योग केल्याने ताणतणाव कमी होतो. ताणामुळे मेंदूवर अतिरिक्त भार येतो, पेशी कमकुवत होतात आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता घटते. मात्र योग आणि प्राणायाम यामुळे मेंदूला आराम मिळतो आणि मन शांत होते.


ध्यान म्हणजे काही काळ शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करणे आणि मन पूर्णपणे वर्तमानात आणणे. हे केल्याने मज्जासंस्था स्थिर होते, नकारात्मक विचार कमी होतात आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते. ध्यानादरम्यान हिप्पोकॅम्पसची कार्यक्षमता वाढते, ज्याचा थेट परिणाम स्मरणशक्ती आणि शिकण्याच्या क्षमतेवर होतो.


योगामध्ये काही विशिष्ट आसने आणि प्राणायाम स्मरणशक्ती व एकाग्रता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात :

  • अनुलोम-विलोम व कपालभाती प्राणायाम – मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा वाढवतात.

  • वृक्षासन व ताडासन – एकाग्रता व लक्ष वाढवतात.

  • पश्चिमोत्तानासन – मनाला शांत करून लक्ष केंद्रित करण्यास मदत करते.


अनेक आंतरराष्ट्रीय अभ्यासातून सिद्ध झाले आहे की नियमित योगा आणि ध्यान करणाऱ्यांची स्मरणशक्ती, शिकण्याची क्षमता आणि एकाग्रता हे इतरांपेक्षा अधिक चांगले असते. इतकेच नव्हे तर वृद्धांमध्ये नियमित योगामुळे अल्झायमर व डिमेंशिया यांसारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो.


तज्ज्ञांच्या मते, सकाळी किंवा संध्याकाळी फक्त १५ ते २० मिनिटे ध्यान आणि २० ते २५ मिनिटे योगा पुरेसा ठरतो. हे करण्यासाठी विशेष जागेची आवश्यकता नाही; शांत आणि स्वच्छ जागा पुरेशी असते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here