इस्लामपूरजवळ डॉक्टर पत्नीची आत्महत्या; कारच्या मागे रक्ताच्या थारोळ्यात आढळल्या – तणावातून टोकाचं पाऊल?

0
347
CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 75

इस्लामपूर (प्रतिनिधी):
मुंबईतील महिला डॉक्टरने इस्लामपूरजवळ स्वतःच्या कारमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉ. शुभांगी समीर वानखेडे (वय ४४, रा. ईएसआयसी हॉस्पिटल क्वार्टर्स, मुलुंड पश्चिम, मुंबई) यांनी मंगळवारी रात्री पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाळवा तालुक्यातील विठ्ठलवाडी हद्दीत स्वतःचा अंत केला.

घटनेमुळे वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, शुभांगी यांनी गाडीच्या मागे स्वतःच्या हाताच्या आणि गळ्याच्या नसा ब्लेडने कापून आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे.

सकाळी दवाखान्यात जाण्याचं सांगून निघाल्या, रात्री गाडीत सापडल्या

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. शुभांगी वानखेडे मंगळवारी सकाळी आपल्या पतीला “दवाखान्यात जाते,” असे सांगून घरातून निघाल्या. मात्र त्या प्रत्यक्षात कोल्हापूरच्या दिशेने निघाल्या होत्या. त्यांचा मोबाईल दिवसभर बंद होता, यामुळे नातेवाईक चिंतेत होते.

त्याच रात्री सुमारे ११ च्या सुमारास विठ्ठलवाडी गावाच्या पांढरावडा परिसरात रस्त्याकडेला उभी असलेली एमएच ०३ एआर १८९६ क्रमांकाची गाडी स्थानिकांना आढळली. संशय आल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, गाडीच्या मागच्या बाजूस शुभांगी बेशुद्ध अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आल्या.

ब्लेडने खोल जखमा – गाडीत रक्ताचा सडा

शुभांगी यांच्या डाव्या हातावर आणि गळ्यावर ब्लेडने खोल जखमा झाल्या होत्या. गाडीत आतूनही रक्ताचा सडा पडलेला होता. पोलिसांनी तातडीने त्यांना इस्लामपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्या मृत झाल्याचे जाहीर केले.

पोलिसांनी गाडीची झाडाझडती घेतली असता ओळखपत्रावरून मृत व्यक्तीची ओळख पटली. शुभांगी यांच्या मोबाईलमधून व इतर पुराव्यांमधून आत्महत्येपूर्वी काहीही निरोप वा चिठ्ठी मिळाली नसल्याचं समजतं.

कोरोना काळानंतर तणावात होत्या

डॉ. शुभांगी या गेल्या काही महिन्यांपासून मानसिक तणावात होत्या, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. त्यांचे पती डॉ. समीर वानखेडे हेही डॉक्टर असून, दोघांनाही कोरोना महामारीनंतर वैद्यकीय व्यवसायात मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं.

तणाव, आर्थिक दडपण व व्यावसायिक अपयशामुळे शुभांगी मानसिक नैराश्यात गेल्या होत्या, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, ही आत्महत्या आहे की यामागे आणखी काही कारण आहे, याचा तपास वाळवा पोलीस करत आहेत.

कुटुंबाची दु:खांत अवस्था

शुभांगी यांच्या पश्चात त्यांचे पती डॉ. समीर, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. बुधवारी सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. अचानक झालेल्या या घटनेमुळे वानखेडे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

मानसिक आरोग्यावर भर देण्याची गरज

ही घटना वैद्यकीय व्यवसायात असलेल्या व्यक्तींना भेडसावणाऱ्या मानसिक समस्यांचे वास्तव अधोरेखित करते. मानसिक आरोग्याविषयी अधिक जागरूकता, सहकार्य आणि वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here