
माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई : भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या शेतकऱ्यांबाबतच्या वादग्रस्त विधानाने राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या विधानावर तीव्र प्रतिक्रिया देत भाजपवर जोरदार टीका केली आहे.
आमदार लोणीकर यांनी एका कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या संदर्भात अत्यंत खालच्या पातळीचे भाष्य केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, “शेतकऱ्यांच्या अंगावरचे कपडे, पायातील चप्पल, हातातील डबे हे सर्व आमच्या सरकारमुळे मिळाले आहेत. आमचंच घेतो आणि आम्हालाच विरोध करतो?” असा संतापजनक सवाल करत त्यांनी शेतकऱ्यांवर उपकार केल्याचा सूर लावला.
या विधानावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वरून भाजपवर निशाणा साधला. “भाजप नेते शेतकऱ्यांवर उपकार करत असल्याची भाषा वापरतात, ही त्यांच्या पक्षसंस्कृतीची साक्ष आहे. एकीकडे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला असताना, त्याला मदतीऐवजी उपकाराची भाषा नेत्यांना शोभते का?” असा थेट सवाल करत, “भाजप नेते शेतकरी बापाला भिकारी समजतात का?” असा रोखठोक प्रश्न उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, “निवडणुकीआधी नरमी दाखवणारे, कर्जमाफीचे आश्वासन देणारे आता शेतकऱ्यांविषयी खालच्या भाषेत बोलतात. हेच जर खरं नेतृत्व असेल, तर शेतकऱ्यांनी लवकरच या लबाड लांडग्यांना चपेटात घ्यावे.”
लोणीकर यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून, शेतकरी संघटनांनीही नाराजी व्यक्त केली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य भाजपसाठी अडचणीत आणणारे ठरू शकते, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.