
माणदेश एक्सप्रेस न्यूज | बरेली (उत्तर प्रदेश) :
बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घरावर झालेल्या गोळीबाराने संपूर्ण देशात खळबळ उडवली होती. या प्रकरणातील आरोपींचा उत्तर प्रदेश एसटीएफ, दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखा आणि हरियाणा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत एन्काऊंटर करण्यात आला आहे. या चकमकीत दोन्ही आरोपी ठार झाले असून चार पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत.
पोलिसांनी आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 2500 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले. त्यात आरोपींपैकी एकाने घातलेले लाल रंगाचे बूट पोलिसांसाठी निर्णायक ठरले. हा छोटासा तपशील लक्षात घेतल्यानंतर तपासाचा धागा जुळू लागला आणि आरोपींचा माग काढण्यात पोलिसांना यश आलं.
एसटीएफचे एएसपी राजकुमार मिश्रा यांनी सांगितले की, गुप्तचर यंत्रणा, दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी मिळून आरोपींच्या हालचालींवर नजर ठेवली होती. आरोपींचे जुने रेकॉर्डही तपासण्यात आले. त्यातून स्पष्ट झाले की, गोळीबार करणारे आरोपी हरियाणातील रोहतकचा रवींद्र उर्फ कल्लू आणि सोनीपतचा अरुण हे होते.
दोघंही आरोपी बरेलीकडे येत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. मात्र, पकडण्याचा प्रयत्न होताच आरोपींनी पोलिसांवर अंधाधुंद गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल एसटीएफनेही गोळीबार केला. यात दोघे आरोपी गंभीर जखमी झाले आणि रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.
पोलिसांनी एन्काऊंटरच्या ठिकाणाहून एक ग्लॉक पिस्तूल, एक झिगाना पिस्तूल, अनेक जिवंत काडतुसे आणि पांढरी अपाचे मोटरसायकल जप्त केली आहे. चौकशीत दिशाच्या वडिलांनी आरोपी पांढऱ्या अपाचेवरून आले असल्याची माहिती दिली होती.
कुख्यात गुंड गोल्डी ब्रार गँगने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट करून या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. या गँगशी संबंधित असलेल्या रोहित गोदाराच्या आयडीवरून पोस्ट करण्यात आलेल्या संदेशात म्हटले होते की, “दिशाची बहीण खुशबू पटानीने स्वामी अनिरुद्धाचार्य आणि स्वामी प्रेमानंद यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे संतापून हा गोळीबार करण्यात आला.” यासोबत भविष्यात पुन्हा अशीच कारवाई केली जाईल, अशी धमकी देण्यात आली होती.
एएसपी मिश्रा यांनी सांगितले की, ही कारवाई संघटित गुन्हेगारी नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे. अशा प्रकारच्या गुन्हेगारी टोळ्यांना थारा दिला जाणार नाही. या एन्काऊंटरनंतर बरेलीसह आसपासच्या भागात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.