
माणदेश एक्सप्रेस न्यूज | बरेली (उत्तर प्रदेश):
बॉलिवूडची नामांकित अभिनेत्री दिशा पटानी हिच्या उत्तर प्रदेशातील बरेली येथील घरावर झालेल्या गोळीबारामुळे खळबळ उडाली आहे. हा प्रकार शनिवारी पहाटे ३.३० ते ४ वाजताच्या सुमारास घडला. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी दिशाच्या घरावर गोळीबार केला. सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी झालेले नाही.
या गोळीबाराची जबाबदारी रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार टोळीने स्वीकारली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये हल्लेखोरांनी स्पष्ट केलं की, हा हल्ला कथित धर्म आणि संतांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ करण्यात आला आहे.
त्या पोस्टमध्ये स्वत:ला वीरेंद्र चरण, महेंद्र सरन (डेलाना) असल्याचं सांगत, लिहिलं आहे –
“आज खुशबू पटानी आणि दिशा पटानी यांच्या घरावर झालेला गोळीबार आम्ही केला आहे. तिने पूज्य संत प्रेमानंद महाराज आणि अनिरुद्धाचार्य महाराजांचा अपमान केला आहे. सनातन धर्माचा अवमान सहन केला जाणार नाही. हा फक्त ट्रेलर होता, पुढे जर पुन्हा धर्माचा अनादर झाला तर घरात कोणीही जिवंत राहणार नाही.”
हल्लेखोरांच्या या पोस्टमध्ये पुढे स्पष्ट धमकी देण्यात आली आहे की, “जो कोणी धर्म आणि संतांविरुद्ध अपमानजनक कृत्य करेल त्याने गंभीर परिणाम भोगण्याची तयारी ठेवावी. आमच्यासाठी धर्म आणि समाज एक आहे आणि त्यांचे रक्षण करणे हेच आमचे पहिले कर्तव्य आहे.”
या घटनेची माहिती मिळताच बरेलीचे एसएसपी अनुराग आर्य यांनी पोलिस पथके घटनास्थळी दाखल केली. तपासासाठी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांनी म्हटले – “आज पहाटे ३.३० वाजता निवृत्त सीईओ जगदीश पटानी यांच्या घरी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेनंतर तातडीने चौकशी सुरू केली असून आरोपींना गाठण्यासाठी विशेष टीम कार्यरत आहेत.”
या घटनेनंतर बरेलीत तसेच पटानी कुटुंबाच्या घराजवळ कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. पोलिसांनी शेजारच्या सीसीटीव्ही फुटेजसह सायबर सेलची मदत घेऊन सोशल मीडियावरून हल्लेखोरांचा मागोवा सुरू केला आहे.
दिशा पटानी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री असल्याने या हल्ल्यामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. धार्मिक अपमानाच्या कारणावरून टोळ्यांनी थेट धमक्या देणं हा चिंतेचा विषय ठरत असून, या घटनेमुळे कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.