
माणदेश एक्सप्रेस | आरोग्य विशेष
पाय ही शरीराची सर्वात जास्त काम करणारी आणि सर्वात जास्त धूळ, चिखल व मातीशी संपर्कात येणारी जागा आहे. दिवसभर चालणे, बूट-चप्पल वापरणे, घाम आणि धूळ यामुळे पायाच्या नखांमध्ये घाण अडकते. ही घाण सहज निघत नाही आणि नखांमध्ये साठत राहते. वेळेवर लक्ष दिले नाही तर त्यातून दुर्गंधी, नखं तुटणे, बुरशी वाढणे आणि गंभीर त्वचारोग होण्याचा धोका निर्माण होतो.
विशेषतः पावसाळ्यात चिखल व माती सतत नखांना चिकटत राहते. काही वेळा नखांचा रंगच बदलतो, ठणकाही लागतो आणि ही माती काढणे अधिक त्रासदायक ठरते. आरोग्य तज्ज्ञ सांगतात की पाय व नखांची नियमित स्वच्छता हीच त्वचारोगापासून बचावाची पहिली पायरी आहे.
पायाची नखे स्वच्छ ठेवण्यासाठी सोपे घरगुती उपाय
1️⃣ कोमट पाण्याचा वापर : आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा पाय कोमट पाण्यात भिजवा. त्या पाण्यात थोडे मीठ घातल्यास पाय मऊ होतात व अडकलेली घाण सहज सुटते. पाय किमान दहा मिनिटे भिजवल्यावर हाताने नखे चोळल्यास स्वच्छ होतात.
2️⃣ नखे वेळोवेळी कापणे : मोठ्या नखांमध्ये घाण पटकन साचते. त्यामुळे नियमित नखे कापणे गरजेचे आहे. नखं साफ करताना पिन किंवा धारदार वस्तू वापरू नयेत. असे केल्याने जखम होण्याची शक्यता असते.
3️⃣ घरगुती लिक्विडने स्वच्छता : बादलीत कोमट पाणी घेऊन त्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा, थोडा लिंबाचा रस आणि मीठ मिसळा. या द्रावणात पाय दहा मिनिटे भिजवल्यास नखांतील घाण मऊ होऊन सहज सुटते. यामुळे पायातील दुर्गंधी कमी होते आणि नखांची चमकही टिकते.
4️⃣ पाय नेहमी कोरडे ठेवणे : पाय धुतल्यावर व्यवस्थित कोरडे करणे अत्यंत आवश्यक आहे. ओलसर पायावर लगेच सॉक्स किंवा बूट घातल्यास बुरशी वाढते आणि त्वचेवर इन्फेक्शन पसरते.
दुर्लक्ष केल्यास होऊ शकतात गंभीर त्रास
➡️ पायाच्या नखांत बुरशी वाढणे
➡️ दुर्गंधी व त्वचेवर लालसरपणा
➡️ नखं ठिसूळ होणे व तुटणे
➡️ पायाला सूज व जखम
तज्ज्ञांच्या मते, “पाय आणि नखांची स्वच्छता ही फक्त सौंदर्यासाठी नाही, तर गंभीर आजारांपासून बचावासाठी आवश्यक आहे. नियमित पाय धुणे, नखे कापणे आणि कोरडे ठेवणे ही सवय लावली तर त्वचारोगापासून सुरक्षित राहता येते.”