
माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी बैठका सुरू केल्या असतानाच, पक्षातील अंतर्गत वाद उफाळून आले आहेत. कांदिवलीत भाजपच्या दोन गटांमध्ये थेट हाणामारी झाली. विशेष म्हणजे, हा सारा प्रकार मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या समोरच घडला.
जानुपाडा, कांदिवली (पूर्व) येथे ही घटना घडली. स्थानिक वनजमिनीच्या मालकीच्या वादावरून रहिवाशांमध्ये असलेला असंतोष लक्षात घेऊन शेलार या भागातील पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले होते. मात्र बैठकीआधीच दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला आणि पाहता पाहता वादाने हिंसक वळण घेतले.
शेलारांच्या कारसमोरच कार्यकर्ते एकमेकांना शिवीगाळ करत धावून गेले आणि मारहाण सुरू झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. या वादामुळे संपूर्ण परिसरात काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली.
या घटनेनंतर भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी हस्तक्षेप करत वाद शांत करण्याचा प्रयत्न करत होते. या घटनेबद्दल एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, “हा आमचा पक्षातील अंतर्गत वाद असून वरिष्ठ याची दखल घेतील. आम्ही सध्या मेडिकल तपासणीसाठी जात आहोत. त्यानंतर निर्णय घेतला जाईल.”
हा प्रकार घडल्यानंतर भाजपमध्ये गटबाजीचे स्वरूप स्पष्ट झाले आहे. यापूर्वीही मुरबाड नगरपंचायत उपनगराध्यक्ष निवडणुकीवेळी भाजपच्या नगरसेवकांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवाराला मतदान केले होते. त्यामुळे भाजपला आता निवडणूकपूर्वी पक्षातील एकजुटीचे मोठे आव्हान आहे.