
माणदेश एक्सप्रेस न्युज / आटपाडी / प्रतिनिधी : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिघंची परिसरातील राजकीय समीकरणांना मोठा कलाटणी देणारी घडामोड समोर आली आहे. दिघंची येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते ॲड. विलासराव देशमुख तसेच बळीराजा शेतकरी संघटनेचे डॉ. उन्मेश देशमुख व महेश देशमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला आहे. या पाठिंब्यामुळे दिघंची जिल्हा परिषद गटात शिवसेनेची ताकद लक्षणीयरीत्या वाढली असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
यावेळी बोलताना ॲड. विलासराव देशमुख यांनी सांगितले की, “दिघंची परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम, लोकाभिमुख आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे नेतृत्व आवश्यक आहे. ही भूमिका लक्षात घेता दिघंची जिल्हा परिषद गटाचे शिवसेना उमेदवार पृथ्वीराज पाटील व दिघंची पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ. कल्पना देवेंद्र पुसावळे यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण एकदिलाने प्रयत्न करणार आहोत.”
बळीराजा शेतकरी संघटनेचे डॉ.उन्मेश देशमुख यांनी शेतकरी, कष्टकरी, युवक आणि महिलांच्या प्रश्नांवर शिवसेनेची भूमिका ठाम असल्याचे सांगत या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त केला. महेश देशमुख यांनीही गावपातळीवरील विकासकामे, पाणी, रस्ते, वीज व शेतीसंबंधित प्रश्नांवर पृथ्वीराज पाटील व सौ.कल्पना पुसावळे यांचे कार्य विश्वासार्ह असल्याचे नमूद केले.
यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या हस्ते ॲड. विलासराव देशमुख, डॉ. उन्मेश देशमुख व महेश देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. तानाजीराव पाटील यांनी या पाठिंब्यामुळे दिघंची गटात शिवसेनेचा विजय अधिक भक्कम होईल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमास शिवसेनेचे पदाधिकारी, विविध गावांतील कार्यकर्ते, युवक-युवती व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जाहीर पाठिंब्यामुळे दिघंची जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात निवडणूक लढत अधिक रंजक बनली असून, शिवसेनेच्या प्रचाराला नवे बळ मिळाल्याचे बोलले जात आहे.


