
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | मुंबई :
हिऱ्यांच्या व्यवहारावर मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून मुंबईतील एका नामांकित व्यापाऱ्याची तब्बल ६६ लाख ८१ हजार ३१० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुण्यातील उदय चौगले या संशयिताविरुद्ध वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार महेश नयानी (वय ४३) हे ‘वर्णी स्टार’ नावाची हिऱ्यांची कंपनी आपल्या दोन भागीदारांसोबत चालवतात. ते अनेक वर्षांपासून मुंबईतील हिरे व्यवसायात कार्यरत आहेत. सुमारे आठ महिन्यांपूर्वी त्यांचा व्यावसायिक संपर्क पुण्यातील उदय चौगले याच्याशी झाला. सुरुवातीच्या काही व्यवहारांमध्ये चौगले याने वेळेवर पैसे देऊन विश्वास संपादन केला. यामुळे नयानी यांचा त्याच्यावर विश्वास बसला.
यानंतर १३ ऑगस्ट रोजी चौगले याने नयानी यांना संपर्क करून सांगितले की, “माझ्याकडे एक मोठी ग्राहक कंपनी आहे, त्यांना व्हाईट राऊंड कट उच्च प्रतीचे हिरे हवे आहेत. व्यवहार तातडीचा आहे आणि नफा देखील भरघोस मिळेल.” अशा प्रकारे विश्वास संपादन करून त्याने नयानी यांच्याकडून २३०.३९ कॅरेट वजनाचे हिरे, एकूण ६६,८१,३१० रुपये किमतीचे घेतले.
नियमानुसार झांगड पावती तयार करून नयानी यांनी हिरे चौगले याच्याकडे दिले. ठरल्याप्रमाणे पंधरा दिवसांच्या आत पेमेंट होणे अपेक्षित होते. मात्र, काही दिवसांनी जेव्हा नयानी यांनी पैशांची चौकशी केली, तेव्हा चौगले याने “सध्या गणेशोत्सव सुरु असल्याने थोडा वेळ लागेल” असे सांगून वेळ काढली.
यानंतर नयानी यांनी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु चौगले याचा मोबाइल फोन बंद येऊ लागला. चौगले याने ना पैसे दिले, ना हिरे परत केले. त्यामुळे त्याने जाणूनबुजून फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकारानंतर महेश नयानी यांनी बीकेसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर संशयित उदय चौगले याच्याविरुद्ध फसवणुकीचा (धोका देण्याचा) गुन्हा भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० अंतर्गत दाखल केला आहे.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, चौगले हा पुण्यातील हिरे व्यापार क्षेत्रात पूर्वीही काही वादग्रस्त व्यवहारांमध्ये सहभागी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे. या प्रकरणाचा तपास बीकेसी पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या घटनेमुळे हिरे व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. विश्वासाच्या आधारावर चालणाऱ्या या व्यवसायात अशा फसवणुकीच्या प्रकरणांमुळे अनेक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.