
माणदेश एक्सप्रेस न्युज | धाराशिव :
राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पावसाचा कहर सुरू आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून हजारो शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतकरी हवालदिल झाले असून पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर असताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या वर्तनावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
२४ सप्टेंबर रोजी तुळजापुरात झालेल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमात जिल्हाधिकारी स्वतः डान्स करताना दिसल्या. या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून संतप्त नागरिकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावं पावसाच्या पाण्याने वेढली गेली आहेत. शेतीतील उभी पिके वाहून गेल्याने शेतकरी धास्तावले आहेत. अनेकांनी शेतीत गुंतवणूक करून पेरणी केली होती, मात्र मुसळधार पावसामुळे पिके पूर्णपणे उध्वस्त झाली आहेत. शेतकरी अश्रूंना वाट मोकळी करून देत असतानाच, जिल्हाधिकारी संकट काळात लोकांमध्ये धीर देण्याऐवजी नाच-गाण्यात रमल्याचा आरोप होत आहे.
कार्यक्रमातील डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. “जिल्ह्यात पूरस्थिती आहे, शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत, हजारो कुटुंबे मदतीची वाट पाहत आहेत आणि अशा वेळी जिल्हाधिकारी मनोरंजनात मग्न आहेत,” अशी टीका होत आहे. अनेकांनी त्यांच्या तात्काळ बदलीची मागणी केली आहे.
सामान्य नागरिक, शेतकरी आणि विरोधकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या वागण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “धाराशिव जिल्ह्यातील जनतेला आधार देणे आणि मदतकार्य गतीमान करणे ही जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. मात्र त्यांनी स्वतःच्या पदाला शोभेल असं वर्तन केलं का?” असा सवाल उपस्थित होत आहे.
या प्रकरणावर अद्याप राज्य सरकारकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र शेतकरी संघटनांनी याबाबत कडक भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे.
शेतकऱ्यांचे हाल पाहून जनतेला अपेक्षा असते की प्रशासन त्यांच्यासोबत उभं राहील. मात्र अशा गंभीर काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या हलक्याफुलक्या कार्यक्रमामुळे प्रशासनावरील विश्वास डळमळीत होण्याची शक्यता आहे.