
सांगली | माणदेश एक्सप्रेस न्यूज
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आपल्या परखड वक्तव्यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ निर्माण केली आहे. सांगली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत, “धनंजय मुंडेला पुन्हा मंत्रिपद मिळावे, हे स्वप्नातही येऊ नये,” असा संतप्त इशारा दिला.
जरांगे म्हणाले, “आमचे नशीब इतके वाईट आहे की, आम्ही ज्यांना मोठं करतो तेच आमच्या लेकरा-बाळांकडे बघत नाहीत.” मराठा नेत्यांनी आता एकत्र येऊन समाजाच्या मागण्यांसाठी एकजूट दाखवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. “ही सांगलीची भूमी क्रांतिकारक भूमी आहे. इथूनच मी आव्हान करतो – मराठा नेत्यांनी जागे व्हा!” असे ते भावनिक होत म्हणाले.
मुंबईत होणाऱ्या आगामी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तयारीबाबत सांगताना स्पष्ट केलं की, “100 टक्के मराठा मुंबईत दिसणार आहेत. सरकारला मान्य करावं लागेल, कारण ही शेवटची लढाई आहे. कायद्याच्या चौकटीत राहून शांततेत आंदोलन होणार आहे.”
ते पुढे म्हणाले, “मी आता थकलो आहे. शरीर साथ देत नाही. पण समाजासाठी हे अंतिम युद्ध आहे. आरक्षण मिळेपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही.” यावेळी त्यांनी ‘एक घर, एक गाडी’ मोहीम सुरू करणार असल्याचाही उल्लेख केला.
बीडमधील गुन्हेगारीवरही सडकून टीका
बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी संदर्भातही त्यांनी संताप व्यक्त केला. “बीडमध्ये गुंडगिरी संपायला अजून २० वर्ष लागतील. प्रशासन पूर्णपणे पक्षीय झाला आहे. पालकमंत्री अजित पवारांनी केवळ भेटी न देता कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी केली.
महादेव मुंडे प्रकरण, संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि परळी तालुक्यातील पोलीस प्रशासन यांच्यावर त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत, “बीडचे प्रशासन निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत ठेवावे,” अशी मागणी केली.
राजकीय हालचालींवर नजर
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी थेटपणे धनंजय मुंडेंच्या संभाव्य मंत्रिपदाविरुद्ध विरोध दर्शवला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.