
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | मुंबई/ठाणे/कल्याण :
“ढाक्कूमाक्कुम, ढाक्कूमाक्कुम… मच गया शोर सारी नगरी…” अशा गाण्यांवर ताल धरत संपूर्ण महाराष्ट्र आज उत्साहाच्या उन्मेषात रंगून गेला आहे. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने शनिवारी (१६ ऑगस्ट) दहीहंडीचा जल्लोष राज्यभर दणदणीतपणे साजरा होत आहे. सकाळपासूनच मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे, नाशिक, नगर, कोल्हापूर अशा सर्व भागांत गोविंद पथकांच्या जल्लोषाने रस्ते गजबजले आहेत. पावसाच्या सरींना न जुमानता, अपघाताचा धोका पत्करत, थरार आणि जोश यातून दहीहंडी फोडण्याचा सोहळा रंगला आहे.
मुंबईत महिला गोविंदांचा वेगळा ठसा
मुंबईतील दादरच्या आयडियल बुक डेपो येथे साईदत्त मित्रमंडळाच्या दहीहंडी उत्सवाची सुरुवात महिला पथकाने केली. तेजस्विनी महिला गोविंदा पथकाच्या सहभागामुळे या दहीहंडीला अनोखं आकर्षण लाभलं. महिलांनीही पुरुषांच्या बरोबरीने ‘गोविंदा आला रे आला’चा जल्लोष साजरा करत आपल्या कौशल्याची छाप पाडली.
या ठिकाणी एक विशेष उपक्रम म्हणून सायबर सिक्युरिटीविषयी जनजागृती करणारे पथनाट्य रंगवण्यात आलं. त्यामुळे पारंपरिक उत्सवात सामाजिक संदेशाची जोडही मिळाली.
ठाण्यात गोकुळ हंडीचा जल्लोष
ठाण्यातील कॅसलमिल परिसरात शारदा संकल्प प्रतिष्ठान आयोजित गोकुळ हंडीची धूम पाहायला मिळाली. कृष्णा पाटील यांच्या नेतृत्वाखालील या दहीहंडीचा लौकिक इतका वाढला आहे की सकाळपासूनच पथकांची नोंदणी करण्यासाठी गर्दी उसळली. ठाण्यातील मानाच्या हंड्यांपैकी ही हंडी गणली जाते. स्थानिक आणि बाहेरील गोविंद पथकांमध्ये सलामी देण्यासाठी प्रचंड चुरस लागलेली दिसून आली.
कल्याण-डोंबिवलीत ३२५ दहीहंड्या, पोलिसांची कडेकोट तयारी
यंदा कल्याण-डोंबिवली परिसरात खासगी २७५ आणि सार्वजनिक ५० मिळून तब्बल ३२५ दहीहंड्या फोडल्या जाणार आहेत. या संख्येतूनच या भागातील उत्साहाचा अंदाज येतो.
छत्रपती शिवाजी चौकातील शिंदे-ठाकरे गटाच्या समोरासमोरच्या हंड्या प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहेत.
गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी SRPF तुकडी, २२ निरीक्षक, ७१ अधिकारी आणि ६०० हून अधिक पोलिस कर्मचारी कायदा-सुव्यवस्थेसाठी तैनात करण्यात आले आहेत.
पोलिसांनी गर्दी नियंत्रणासाठी विशिष्ट नाकेबंदी, बॅरिकेट्स आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधा ठेवलेल्या आहेत.
जय जवान पथकाची मानाची दहीहंडी
मुंबईतल्या जय जवान गोविंदा पथकाने यंदा मानाची दहीहंडी फोडली. पुढे हे पथक दादरमधील हिंदू कॉलनी येथे तब्बल ९ थरांचा मानवी मनोरा रचून ‘सलामी’ देणार आहे.
या पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे म्हणाले –
“संपूर्ण मुंबईला आणि महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आमचं अपूर्ण स्वप्न आज पूर्ण होईल, अशी खात्री आहे.”
राजकारणाचा रंगही ठळक
आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दहीहंडीचे राजकीय रंगही ठळक दिसत आहेत. मुंबईतील प्रमुख मंडळांसह उपनगरांमध्ये राजकीय पक्षांकडून भव्य आयोजनं करण्यात आली आहेत. काही ठिकाणी राजकीय नेते व सेलिब्रिटींच्या उपस्थितीमुळे उत्सवाला वेगळा ग्लॅमरही प्राप्त झाला आहे.
गोविंदांचा थरार आणि सुरक्षेची खबरदारी
गेल्या काही वर्षांत अपघाताच्या घटना घडल्यामुळे यंदा गोविंदांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं जात आहे. हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, हार्नेस यांचा वापर काही पथकांनी अनिवार्य केला आहे.
मुंबई, ठाणे, कल्याणसह पुणे, नाशिक आदी शहरांत आपत्कालीन वैद्यकीय पथके, ॲम्ब्युलन्स व अग्निशमन दल सज्ज ठेवण्यात आले आहे. याशिवाय काही ठिकाणी सीसीटीव्हीद्वारे पोलिसांनी विशेष लक्ष ठेवले आहे.
गावोगावी दहीहंडीचा सोहळा
राजधानी मुंबईच्या बरोबरीने सांगली, कोल्हापूर, सातारा, नाशिक, नगर, पुणे यांसारख्या जिल्ह्यांतही दहीहंडीची जोरदार धूम सुरू आहे. गावोगावी तरुणांनी गोविंदा पथकं तयार करून मानवी मनोरे रचत परंपरा जिवंत ठेवली आहे. ग्रामीण भागातही दहीहंडी हा केवळ उत्सव न राहता सामूहिक एकात्मतेचा सोहळा ठरत आहे.