
माणदेश एक्सप्रेस/मुंबई : मला अतिशय आनंद आहे की अंबाबाईच्या नगरीत नव्या विमानतळावर पहिलं विमान घेऊन येण्याची मला संधी मिळाली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत गाडगेबाबा, चक्रधर स्वामी आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवली ते पंजाबराव देशमुख या सर्वांच्या चरणी मी आज नतमस्तक होतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच त्यांनी त्यांच्या आईचा उल्लेख केला आणि अमरावतीचं माझ्यावर कर्ज आहे असंही विधान केलं.
“आपण असं ऐकलं आहे की रुक्मिणीचं हरण करताना अमरावतीमधून श्रीकृष्णाने वायुवेगाने ते हरण केलं होतं. आता वायुवेग तर पाहण्यास मिळणार नाही. पण अमरावतीत वायुयानाने येता येईल आणि जाता येईल ही व्यवस्था मात्र माननीय मोदींच्या सरकारने केली त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. आत्ताच मंत्रीमहोदय म्हणाले की डबल इंजिनचं सरकार असलं की काय होतं. महाराष्ट्रात डबल इंजिन विथ डबल बूस्टर सरकार आहे. आम्ही तिघे मिळून महाराष्ट्र पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत.”
अमरावती शहराचं माझ्यावर कर्ज आहे. कारण माझी आई अमरावतीची आहे. त्यामुळे अमरावतीशी माझं एक वेगळं नातं आहे. अमरावतीत काहीही चांगलं झालं की सर्वाधिक आनंद माझ्या आईला होत असतो. तिला आनंद देणं हे माझ्या आनंदासाठी महत्त्वाचं कारण असतं. या विमानतळाचं काम पूर्ण केलं. २०१९ मध्ये आपण विमानतळाचं काम सुरु केलं होतं. सुरुवातीला धावपट्टीचा विस्तार केला. त्यानंतर काही कारणाने ते काम बंद पडलं होतं. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात पुन्हा सरकार आल्यानंतर वेगाने ते काम पूर्ण केलं. आज मला आनंद आहे फक्त विमानतळ तयार नाही तर उडान या योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारने पहिलं विमान या ठिकाणी दिलं. त्या विमानात बसून आम्हाला येता आलं त्यामुळे मी मोदींचे आणि केंद्रीय मंत्र्यांचे आभार मानतो असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी पायलट ट्रेनिंग स्कूल (वैमानिक प्रशिक्षण शाळा) सुरु होणार आहे. यामुळे आपलं अमरावती जगाच्या नकाशावर येतं आहे. कारण सर्वात मोठं पायलट ट्रेनिंग स्कूल होतं आहे. १८० च्या आसपास वैमानिक या ठिकाणी तयार होतील. ३४ विमानं पार्क असतील. फक्त वैमानिक तयार होतील असं नाही अशा प्रकारची स्कूल आल्याने अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि नोकरीच्या संधीही उपलब्ध होतील. आता अमरावती हे विमानतळ म्हणून फक्त ओळखलं जाणार नाही तर जगाच्या पाठीवर साऊथ एशियातील पायलट ट्रेनिंग स्कूल असलेलं शहर होणार आहे. अशा प्रकारे अमरावतीला नवी ओळख मिळते आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.(स्रोत-लोकमत)