माणदेश एक्स्प्रेस/मुंबई: बॉलिवूड अभिनेते पद्मश्री सैफ अली खान यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ला महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणार आहे. मुंबईतील वर्दळीच्या व्रांद्रे भागात या घटना होत असतील तर मुंबईत कोण सुरक्षित आहे?, मुंबई, पुणे, बीड, परभणी, नागपूरमधील वाढत्या गुन्हेगारी घटना पाहता राज्यात गृहमंत्री आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रिपद सोडावे अशी मागणी काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी केली आहे.
सैफ अलीच्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, भाजपा युती सरकारमध्ये गुंडाराज फोफावले असून सैफ अली खान वरील हल्ला हे गुंडांनी महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्था दिलेले आव्हान आहे. महायुती सरकारच्या काळात गुंडाराज फोफावले असून हे सरकारचे अपयश आहे. भाजपा सरकारमध्ये गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांचे लाडके पोलीस महासंचालक अत्यंत निष्क्रिय आहेत असा आरोप त्यांनी केला.
गुन्हेगारांना सोडणार नाही, कठोर शिक्षा करू अशा विधानांचे पालुपद सोडून काहीतरी कठोर कारवाई करण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांनी दाखवावी असं पटोलेंनी सांगितले.