माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या व्यक्तींना हटविण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या जवळचे सहकारी आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख असलेल्या मंगेश चिवटे यांना हटवून त्यांच्या जागी आता डॉ. रामेश्वर नाईक यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख म्हणून डॉ. रामेश्वर नाईकच काम सांभाळत होते. त्यांना पुन्हा या जागी आणण्यात आले आहे.
कोण आहेत मंगेश चिवटे ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री सहायता निधीतून सर्वाधिक वैद्यकीय मदत करण्यात आलेली होती. या योजनेची त्यावेळी खूपच प्रसिद्धी झाली होती. मंगेश चिवटे हे मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख असताना कोरोना काळात अनेकांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यात मंगेश चिवटे प्रसिद्धीला आले होते. त्यांना मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मुंबईच्या वेशीवर नवी मुंबईच मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आला तेव्हा यांच्याशी चर्चा करण्यासाठी मंगेश चिवटे यांना पाठविण्यात आले होते. त्यांनी आंदोलनात यशस्वी मध्यस्थी केली होती.
कोण आहेत डॉ. रामेश्वर नाईक ?
डॉ. रामेश्वर नाईक यांनी छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून पदवी घेतली आहे. 2014 साली ते वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदा विभागात सल्लागार होते. नंतर त्यांनी धर्मादायी संस्थांमध्ये सल्लागार आणि विश्वस्त म्हणून काम केले. ऑक्टोबर 2023 मध्ये राज्यातील धर्मादायी संस्थांकडून चालवण्यात येणाऱ्या रुग्णालयांचे नियम करणाऱ्या हेल्प डेस्कचे प्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना डॉ. रामेश्वर नाईक यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची जबाबदारी सांभाळली होती.