
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | मुंबई/नवी दिल्ली :
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेटपणे सांगितले की “भारतीय युवक नेपाळच्या युवकांसारखा नाही. त्यांच्याकडे आंदोलनासाठी वेळ नाही. आपल्या युवकांचा विचार वेगळा आहे. ते स्टार्टअप्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आयटी अशा क्षेत्रात व्यस्त आहेत”.
फडणवीस इंडिया टुडे कॉन्क्लेवमध्ये बोलत होते. राहुल गांधी यांनी नुकतेच नेपाळमधील आंदोलनाचा दाखला देत भारतातील Gen-Z ला रस्त्यावर उतरायला आवाहन केले होते. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कडक शब्दांत उत्तर दिलं.
“राहुल गांधी सर्व उपाय करून झाले आहेत. त्यामुळे आता ते हताश झाले आहेत. त्यांना वाटतं की Gen-Z ना अपील करून काहीतरी साध्य करता येईल. पण आपल्या भारतीय युवकांच्या नजरेत राहुल गांधींचं काहीही महत्व नाही. भारतीय युवकांना देशाच्या लोकशाहीबद्दल प्रचंड प्रेम आहे, मात्र आंदोलनात वेळ वाया घालवण्याची त्यांची तयारी नाही. ते भविष्यातील नवनिर्मितीत गुंतलेले आहेत,” असं फडणवीस म्हणाले.
त्यांनी पुढे स्पष्ट केलं – “ज्यांना नेपाळच्या Gen-Z वर प्रेम आहे, त्यांनी नेपाळला जाऊन राहावं. भारत आणि नेपाळ यांचे ऐतिहासिक संबंध मान्य आहेत, पण दोन्ही देशांची स्थिती पूर्णपणे वेगळी आहे.”
फडणवीसांनी भारतीय तरुणाईचा उल्लेख करताना सांगितलं की, “आज भारतीय युवक इंजिनिअर आहेत. जगभरातील सिलिकॉन व्हॅलीमध्ये त्यांची ओळख निर्माण झाली आहे. भारताची Gen-Z नेपाळसारखा विचार करत नाही, त्यांचं लक्ष नव्या संधींवर आणि तंत्रज्ञानावर आहे.”
दरम्यान, महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीची फडणवीसांनी प्रत्यक्ष पाहणी केली. काल (ता.२४) ते थेट शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले. तिथे उभं राहून त्यांनी शेतकऱ्याला आधार दिला आणि पूरग्रस्त तसेच शेतकरी कुटुंबांना मदतीची घोषणा केली.
मराठवाडा, सोलापूरासह अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. पिकं वाहून गेलीच, पण त्यासोबतच मातीसुद्धा निघून गेली आहे. जमिनीची सुपीक थर खरवडला गेल्याने शेतकऱ्यांसमोर भविष्याचं मोठं संकट उभं राहिलं आहे.
एकीकडे फडणवीसांनी राहुल गांधींच्या नेपाळप्रेरित आंदोलनाच्या आवाहनावर थेट हल्लाबोल केला, तर दुसरीकडे त्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी तातडीच्या मदतीची घोषणा करून सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे, असा संदेश त्यांनी दिला.