
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : कृषि उत्पन्न बाजार समिती, आटपाडी येथे शेतकरी व व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली असून या कामांना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. त्यामुळे बाजार समितीचा चेहरामोहरा बदलणार असून शेतकऱ्यांना अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
कृषि उत्पन्न बाजार समिती आटपाडी ही ‘अ’ वर्गामध्ये मोडत असून सन २०२३-२४ पासून नवीन संचालक मंडळ कार्यरत आहे. आमदार सुहास (भैय्या) बाबर (खानापूर-आटपाडी मतदारसंघ) तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती, उपसभापती व संचालक मंडळाच्या प्रयत्नातून ही विकासकामे मंजूर झाली आहेत.
मुख्य बाजार आवारातील आधुनिक डाळिंब पणन संकुलासमोरील पेव्हिंग ब्लॉक व गटर बांधकामासाठी १ कोटी १५ लाख २९ हजार ७५६ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मुख्य बाजार आवार आटपाडी व उपबाजार आवार दिघंची येथे ८० मेट्रिक टन क्षमतेचे वे-ब्रिज (वजनकाटा) उभारण्यासाठी ५३ लाख ९४ हजार ५६० रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
याशिवाय मुख्य बाजार आवारात पॅक हाऊस शेड क्रमांक ३ बांधकामासाठी १६ लाख ५९ हजार ५३२ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या सर्व कामांमुळे शेतमालाच्या विक्री प्रक्रियेला अधिक वेग आणि पारदर्शकता मिळणार आहे.
प्रस्तावित कामांनाही मंजुरीची प्रतीक्षा
बाजार समितीच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी काही महत्त्वाची कामे मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहेत. यामध्ये आधुनिक डाळिंब पणन संकुल क्रमांक २ साठी ३ कोटी ७ लाख १९ हजार ८४० रुपये, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनासाठी १ कोटी ६८ लाख ८२ हजार रुपये, तसेच टॉयलेट-बाथरूम बांधकामासाठी २५ लाख २८ हजार ३३४ रुपयांचा प्रस्ताव आहे. तसेच मुख्य बाजार आवारात २३ लाख रुपये व दिघंची उपबाजारात १३ लाख ९६ हजार रुपयांचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रस्तावही सादर करण्यात आला आहे.
बाजार समितीचा कायापालट होणार
बाजार समितीचा संपूर्ण कायापालट करून राज्यात नावलौकिक मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांना अधिक सुविधा, पारदर्शक व्यवहार व आधुनिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी नियोजनबद्ध काम सुरू असल्याची माहिती सभापती संतोष पुजारी यांनी दिली. या विकासकामांमुळे आटपाडी बाजार समिती शेतकऱ्यांसाठी अधिक सक्षम आणि विश्वासार्ह ठरणार असल्याचे चित्र आहे.


